Kolhapur Crime: टॉवर चोरीच्या वादातून पैलवानाच्या खुनाचा प्रयत्न; चौघांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:36 IST2025-03-28T19:36:07+5:302025-03-28T19:36:26+5:30
पुराव्यांअभावी एकाची सुटका

Kolhapur Crime: टॉवर चोरीच्या वादातून पैलवानाच्या खुनाचा प्रयत्न; चौघांना जन्मठेप
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली येथे शेतातील मोबाइल टॉवरचे अँगल चोरल्याच्या आरोपातून पैलवान संजय राजाराम जाधव (वय ३५) याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. गुरुवारी (दि. २७) झालेल्या सुनावणीत पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी शिक्षा सुनावली.
भरत भीमराव पाटील (२७), दीपक बाळासो इथापे (३३), मयूर महादेव सावंत (२६) आणि विजय बाळू साखरे (२९, चौघे रा. सोंडोली) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश पाटील याची सबळ पुराव्यांअभावी सुटका झाली.
सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोंडोली येथे पैलवान संजय जाधव यांच्या शेतात मोबाइल कंपनीचा टॉवर उभा करण्याचे काम सुरू होते. ऑगस्ट २०१८ मध्ये टॉवरचे अँगल चोरीला गेले. संशयित भरत पाटील आणि त्याच्या मित्रांनी अँगल चोरल्याची माहिती पैलवान संजय याला मिळाली होती. त्यानुसार १९ ऑगस्ट २०१८ रोजी संजय याने भरत पाटील आणि त्याच्या मित्रांना विचारणा केली. त्यावेळी सर्व संशयितांनी चोरीची कबुली देऊन अँगल परत देतो असे सांगितले. मात्र, त्याच दिवशी पाच जण संजयच्या घरात घुसले. आमच्यावर चोरीचा आळ घेतोस काय? असे म्हणत भरत पाटील याने संजयवर चाकूने हल्ला चढवला.
संजयची मोठी बहीण लक्ष्मी जाधव यांनी आरडाओरडा केल्याने गल्लीतील लोकांनी येऊन जखमी संजयला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले. चारही हल्लेखोर पळून गेले. याबाबत लक्ष्मी जाधव यांच्या फिर्यादीनुसार शाहूवाडी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एम. व्ही. जठार यांनी तपास केला.
१२ साक्षीदार तपासले
सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी न्यायालयात १२ साक्षीदार तपासले. फिर्यादी लक्ष्मी जाधव, प्रत्यक्षदर्शी निवृत्ती सावंत, महेंद्र चोरगे, विवेक पाटील यांच्यासह जप्ती पंच बाबूराव डिगे, वैद्यकीय अधिकारी संकेत प्रभुणे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षीदारांच्या साक्षी आणि ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी चौघांना दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
आवाज गेला, दृष्टी अधू झाली
संजय जाधव हा नामांकित पैलवान होता. हल्ल्यात त्याच्या गळ्याला गंभीर इजा झाल्याने आवाज क्षीण झाला. डोळ्याला दुखापत झाल्याने स्पष्ट दिसत नाही. अजूनही त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यात त्याचे कुस्तीचे करिअर उद्ध्वस्त झाल्यामुळे न्यायाधीशांनी हल्लेखोरांंना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.