पेट्रोल पंपावर पोलिसास मारहाण करणारे चौघे अटकेत, तिघांचा शोध सुरू
By उद्धव गोडसे | Updated: December 20, 2023 14:34 IST2023-12-20T14:33:53+5:302023-12-20T14:34:14+5:30
ऑनलाइन पेमेंटवरून झाला वाद

पेट्रोल पंपावर पोलिसास मारहाण करणारे चौघे अटकेत, तिघांचा शोध सुरू
कोल्हापूर : पोलिस मुख्यालयातील पेट्रोल पंपावर पैसे देण्यासाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध नसल्याच्या रागातून कर्मचा-यांना मारहाण करणा-या चौघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. सोमवारी (दि. १८) मध्यरात्री झालेल्या मारहाणीत पोलिस कॉन्स्टेबल अल्ताफ वहीद कुरेशी (वय ३८, नेमणूक नियंत्रण कक्ष) यांच्यासह कर्मचारी किरण आवळे जखमी झाले होते. सहा ते सात जणांनी मारहाण करून पोलिसांच्या पेट्रोल पंपावर दहशत माजवली होती.
परशुराम उर्फ बबलू बाळू बिरंजे (वय २४, रा. विश्वास शांती चौक, कलानगर, कोल्हापूर), बालाजी गोविंद देऊळकर (वय २३, रा. पवार कॉलनी, पाचगाव), सूरज उपेंद्र शिरोलीकर (वय २२, रा. विचारे माळ, कोल्हापूर) आणि पृथ्वीराज संदीप शिंदे (वय १९, रा. कदमवाडी रोड, सदर बाजार, कोल्हापूर) अशी अटकेतील हल्लेखोरांची नावे आहेत. अन्य दोन ते तीन जणांचा शोध सुरू आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास टाटा सफारी गाडीतून सहा ते सात जण पोलिसांच्या पेट्रोल पंपावर आले. त्यांनी २०० रुपयांचे डिझेल घेऊन ऑनलाईन पैसे देणार असल्याचे सांगितले. मात्र, पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण आवळे यांनी ऑनलाइन पैसे देण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने गाडीतील तरुणांनी कर्मचा-यांशी वाद घातला.
काही तरुणांनी खाली उतरून कर्मचा-याला धक्काबुक्की केली. त्यावेळी वाद सोडवण्यासाठी आलेले पोलिस कॉन्स्टेबल अल्ताफ कुरेशी यांना धक्काबुक्की करून हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात दगड घातला. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन शाहूपुरी पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली.