Forty thousand acres hit the vineyards | सांगली जिल्ह्यात अवकाळीने ऊसतोडी थांबल्या : चाळीस हजार एकर द्राक्षबागांना फटका
सांगली जिल्ह्यात अवकाळीने ऊसतोडी थांबल्या : चाळीस हजार एकर द्राक्षबागांना फटका

ठळक मुद्देगळितावर परिणाम

सांगली : अरबी समुद्रातील बदलत्या वातावरणामुुळे पावसाळी ढग एकत्र येऊन कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. सांगलीत मंगळवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. दिवसभर पावसाच्या हालक्या सरी कोसळत होत्या. या वातावरणाचा द्राक्षांना मोठा फटका बसला आहे. ऊस तोडीही थांबल्यामुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अवकाळी पाऊस आज बुधवारी व उद्या गुरुवारीही कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील चाळीस हजार एकरावरील द्राक्षबागांना फटका बसणार आहे.

हंगामाच्या सुरुवातीलाच पुन्हा पावसाला तोंड द्यावे लागत आहे. सलग तीन-चार महिने पावसाच्या माऱ्यातून वाचलेल्या बागा पुन्हा संकटात सापडल्या आहेत. फुलोºयातून बाहेर पडलेल्या व फळधारणा झालेल्या बागांचे मोठे नुकसान होईल, असे सोनी (ता. मिरज) येथील द्राक्ष बागायदार सुरेश नरुटे यांनी सांगितले. पावसाने रानात चिखल झाल्याने ऊसतोडी काही प्रमाणात थंडावल्या आहेत. ऊस भरण्यासाठी वाहने शेतात जाऊ शकत नसल्याने कोयते खाली ठेवावे लागले आहेत. आगाप आणि उशिरा छाटणीच्या बागांमध्ये फळधारणा झाली आहे. आगाप छाटणीच्या बागांत द्राक्षमणी तयार झालेत. पावसाची रिमझिम सुरु असल्याने द्राक्षघडांत पाणी साचणार आहे. औषधांच्या मा-याने ते वाचवावे लागतील. यामुळे बागायतदारांचा खिसा आणखी हलका होणार आहे.

फुटवे कुजणार आहेत, तसेच फुलोराही गळून पडण्याचा धोका आहे. तासगाव, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतील काही शेतकऱ्यांनी तीन महिने पाऊस चुकवून नुकत्याच छाटण्या घेतल्या. पण पावसाच्या संकटातून बाहेर पडल्याचे त्यांचे समाधान सध्याच्या अवकाळीने हिरावले आहे.

 

  • रब्बीला फायदा, हरभरा, गहू, शाळूसाठी चांगला

या अवकाळीचा रब्बीला मात्र चांगलाच फायदा होणार आहे. शाळू, गहू, हरभरा पिकांसाठी हा पाऊस उपकारक ठरेल. पाण्याची एक फेरी त्याने वाचवली आहे. कोळपणी केलेल्या शाळूला या पावसाने चांगलाच हात दिला आहे.
द्राक्षे तडकली

  • सोनी (ता. मिरज) येथील जगन्नाथ काळे या शेतकऱ्याची ज्योती जातीची काळी द्राक्षे अवकाळीच्या तडाख्यात सापडल्याने द्राक्षमणी तडकले आहेत. बाजारात नेण्याची तयारी सुरु असतानाच पावसाने घाला घातला.
Web Title: Forty thousand acres hit the vineyards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.