हातकणंगलेत लाच घेताना वनपाल, वनरक्षक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:05 IST2023-09-01T15:46:02+5:302023-09-01T16:05:22+5:30
२० हजार रुपयांची लाच मागून ती स्विकारताना केली अटक.

हातकणंगलेत लाच घेताना वनपाल, वनरक्षक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
हातकणंगले : जळाऊ लाकूड वाहतूकी साठी भाड्याने घेतलेल्या वाहनाची तपासणी करू नये तसेच लाकूड वाहतूक परवान्यावर कारवाई करु नये. यासाठी २० हजार रुपयांची लाच मागून ती स्विकारताना प्रभारी वनपाल रॉकी केतन देसा रा. बाचणी ता. कागल आणि वनरक्षक मोहन आत्माराम देसाई रा. सुलोचना पार्क प्लॉट नं. १४ ए वार्ड नविन वाशी नाका, कोल्हापर या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, तक्रारदार हे जळाऊ लाकूड खरेदी -विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांनी जत जि. सांगली आणि सांगोला जि. सोलापूर येथे जळाऊ लाकूड खरेदी केली होते. हे लाकूड हातकणंगले आणि इंचलकरंजी येथे पूरवठा करण्यासाठी तक्रारदार यांनी भाडयाच्या गाड्या घेतल्या होत्या.
या वाहतूक गाड्या तपासण्या करू नये, तसेच लाकूड वाहतूक परवान्यावर कारवाई करू नये. यासाठी वनपाल रॉकी केतन देसा आणि वनरक्षक मोहन आत्माराम देसाई यांनी २० हजार रुपयाची लाच मागणी केली होती. मागणी केलेली २० हजारची रक्कम गुरुवारी सायंकाळी स्विकारत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने या दोघाना रंगेहाथ पकडले. या दोघांवर हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई सरदार नाळे. पोलीस उप अधीक्षक. बापू साळुंके,पोलीस निरीक्षक, संजीव बंबरगेकर,विकास माने, सुनिल घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार, उदय पाटील, विष्णू गुरव यांनी केली.