Kolhapur: कोदे जंगलात शिकार करणाऱ्यास वनविभागाने केली अटक; बंदूक, काडतुसासह मृत रानमांजर जप्त
By संदीप आडनाईक | Updated: March 18, 2026 13:18 IST2026-03-18T13:18:12+5:302026-03-18T13:18:41+5:30
पुढील तपास सुरू

Kolhapur: कोदे जंगलात शिकार करणाऱ्यास वनविभागाने केली अटक; बंदूक, काडतुसासह मृत रानमांजर जप्त
कोल्हापूर : गगनबावडा वनपरिक्षेत्रातील कोदे खुर्द जंगल परिसरात शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन घुसलेल्या एका आरोपीला वनविभागाने पकडले आहे. ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे रात्रगस्तीदरम्यान करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे कोदे खुर्द येथील जंगल कक्ष क्रमांक ७९१ मध्ये रानमांजर (फटकूऱ्या) या वन्यप्राण्याची शिकार करताना आनंदा मारुती गुरव (वय ४३, रा. वेसर्डे) यास वनकर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. आरोपीकडून एक बारा बोअर बंदूक, तीन जिवंत काडतुसे तसेच पोत्यात ठेवलेले मृत रानमांजर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वनरक्षक तळीये बुद्रुक यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९(१)(फ) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून, गुन्हा क्रमांक WL-०१/२०२६ दि. १८ मार्च २०२६ अन्वये पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक धैयशिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, वनक्षेत्रपाल ए.डी. राऊत, वनपाल संभाजी चरापले, अमर वेटाळे तसेच वनरक्षक व रेस्क्यू टीमच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली.