कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 21:52 IST2025-08-17T21:52:21+5:302025-08-17T21:52:47+5:30

संवर्धन राखीव क्षेत्रात मागितला होता भाडेपट्टा, सध्या प्रस्तावासाठी कोणताही वैध खाण भाडेपट्टा अस्तित्वात नाही आणि तो मार्च २०२१ मध्ये घोषित केलेल्या संवर्धन राखीव क्षेत्राचा एक भाग आहे.

Forest Advisory Committee rejects Hindalco's bauxite mine in Kolhapur | कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय

कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय

संदीप आडनाईक

कोल्हापूर - पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पश्चिम घाटात कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या खाणीला केंद्राच्या वन सल्लागार समितीने अंतिम मंजुरी नाकारली आहे. पश्चिम घाटातील पर्यावरण-संवेदनशील भागात खाणकामावर बंदी आणि संवर्धन राखीव क्षेत्रात खाणकाम भाडेपट्टा स्थान ही कारणे वन सल्लागार समितीने हिंडाल्को खाण प्रस्तावावर विचार न करण्याची कारणे दिली.

पश्चिम घाटाच्या पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रामध्ये येते म्हणून पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीने ३० जुलैच्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार कोल्हापूरच्या हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बॉक्साइट खाणीसाठी स्टेज-दाेन किंवा अंतिम मंजुरी नाकारली आहे. सध्या प्रस्तावासाठी कोणताही वैध खाण भाडेपट्टा अस्तित्वात नाही आणि तो मार्च २०२१ मध्ये घोषित केलेल्या संवर्धन राखीव क्षेत्राचा एक भाग आहे. हत्ती, गवा, सांबर, हरण, साळींदर, बिबट्या आणि वाघ यांचा वावर या भागात आहे असे मंत्रालयाच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाने एफएसीला सादर केल्याचे इतिवृत्तात नमूद आहे. खाण प्रकल्पाला २००९ मध्ये तत्त्वतः वन मान्यता आणि जानेवारी २०१४ मध्ये केंद्राकडून पर्यावरणीय मंजुरी मिळाली. परंतु, कंपनीला वन संसाधनांचे अधिकार प्रमाणपत्र मिळाले नसल्यामुळे सुमारे १६ हेक्टरचे वनक्षेत्र वळवण्यासाठी अंतिम मंजुरी मिळविण्यात विलंब झाला. कंपनीने या भाडेपट्ट्यावर कोणतेही खाणकाम केलेले नाही.

वनीकरण क्षेत्रात बदल करण्याचा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नावे मोगलगड खाण भाडेपट्ट्यासाठी राखीव वनजमिनीच्या १६.०० हेक्टर (वास्तविक वळवलेले क्षेत्र ९.०५ हेक्टर आहे) च्या वळवण्यासाठी टप्पा-२/अंतिम मंजुरी देण्याचा प्रस्ताव सध्या विचारात घेता येत नाही, असे निरीक्षण समितीने नोंदवले.

या निर्णयाचा आनंद आहे. या प्रदेशातील खाणकामाला विरोध करण्याच्या प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या लढाईचा हा विजय आहे. या निर्णयामुळे पश्चिम घाटातील सर्व खाणकामे रोखले जातील. -डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरणतज्ज्ञ

पश्चिम घाट पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असूनदेखील घाट रस्ते, खाणकाम, अतिक्रमण यामुळे धोक्यात आहे. या निर्णयाने पश्चिम घाट बचावकार्यास बळ मिळणार आहे. -रमण कुलकर्णी, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ

चंदगड संवर्धन राखीव क्षेत्राचा भाग असलेल्या या प्रदेशात आशियाई हत्ती, वाघ, गवा, अस्वल, बिबट्या आढळतात. या कॉरिडॉरची अखंडता जपली पाहिजे.
- गिरीश पंजाबी, संवर्धन संशोधक, वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट

३० वर्षांहून अधिक काळ लढा यशस्वी

मोगलगड हे चंदगड तालुक्यातील राखीव वन क्षेत्र आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील पश्चिम घाटातील खाणकामाचा हा प्रस्ताव केंद्राने नाकारला आहे याचा आम्हाला आनंद आहे. या प्रदेशातील बॉक्साइट खाणकामाला विरोध करणे ही लढाई आम्ही गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ लढत आलो आहोत. यामुळे आपल्या मौल्यवान पश्चिम घाटातील सर्व खाणकाम थांबवण्याचा एक आदर्श निर्माण होईल, अशी आशा आहे. -ॲड. देबी गोएंका, कार्यकारी विश्वस्त, कॉन्सर्वेशन ॲक्शन ट्रस्ट

Web Title: Forest Advisory Committee rejects Hindalco's bauxite mine in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.