Kolhapur: इचलकरंजी महापालिकेत दुरंगी लढतीची शक्यता जास्त, उमेदवार निश्चितीसाठी हालचाली गतिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:28 IST2025-12-17T15:25:13+5:302025-12-17T15:28:15+5:30
पहिल्यांदाच होणाऱ्या महापालिकेच्या सभागृहाचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली

Kolhapur: इचलकरंजी महापालिकेत दुरंगी लढतीची शक्यता जास्त, उमेदवार निश्चितीसाठी हालचाली गतिमान
अतुल आंबी
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. प्रथमदर्शनी दुरंगी लढतीचे संकेत दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून उमेदवारी निश्चित करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. घटक पक्षांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाच लढतीचे चित्र स्पष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
इचलकरंजी नगरपालिकेची ३१ डिसेंबर २०२१ साली शेवटची सभा झाली. त्यानंतर २९ जून २०२२ साली महापालिकेची स्थापना झाली. तब्बल चार वर्षे इचलकरंजीत प्रशासक राज आहे. त्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या महापालिकेच्या सभागृहाचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुखांची डोकेदुखी झाली आहे. त्यातून योग्य उमेदवार शोधून त्याला उमेदवारी देणे यात कस लागणार आहे. त्याचबरोबर उमेदवारी न मिळालेल्यांना नाराजी दूर करून निवडणुकीच्या कामात लावण्याची कसरतही करावी लागणार आहे.
१५ जानेवारी २०२६ ला मतदान आहे. सोमवारी घोषणा झाल्यानंतर अवघ्या एक महिन्याचा कालावधी मिळाला आहे. त्यात प्रचारासाठी १३ दिवसांचा कालावधी आहे. त्यामध्ये किमान १५ ते १६ हजार लोकसंख्येपर्यंत पोहोचावे लागणार असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे.
मातब्बर उमेदवार
तानाजी पोवार, रवींद्र माने, संग्राम स्वामी, अशोक जांभळे, सुहास जांभळे, यश बुगड, विठ्ठल चोपडे, अजित जाधव, महादेव गौड, मदन कारंडे, सागर चाळके, राहुल खंजिरे, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, सुनील महाजन, भाऊसाहेब आवळे, सुनील पाटील, ध्रुवती दळवाई, मनीषा कुपटे, राजू बोंद्रे, सतीश मुळीक, प्रधान माळी, नितीन कोकणे, सचिन हेरवाडे, संगीता आलासे, अमृत भोसले, शहाजी भोसले, संतोष शेळके, संजय आवळे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, संगीता काटकर, राजू कबाडे, रणजित अनुसे, संगीता नेमिष्टे.
सुळकूडचे पाणी ढवळणार
इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा सुळकूडचे पाणी ढवळणार आहे. शहराला स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी मिळण्यासाठी गेली १० वर्षे संघर्ष सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यामुळे स्थानिक निवडणुकीत या पाण्यासह रस्ते आणि महापालिकेच्या कारभारावरून निवडणुकीचे रणांगण गाजणार आहे.
महापालिका स्थापना २९ जून २०२२
एकूण सदस्य - ६५
एकूण प्रभाग - १६
लोकसंख्या
एकूण - २ लाख ९२ हजार ६०
एका प्रभागातील लोकसंख्या - सुमारे १६ हजार.
मागील नगरपालिकेचे पक्षीय बलाबल
भाजप - १ नगराध्यक्ष + १५ सदस्य
ताराराणी पक्ष - १३
कॉँग्रेस - १९
राष्ट्रवादी - ८
राजर्षी शाहू आघाडी - ११
शिवसेना - १
६५ प्रभागांचा लेखाजोखा
महापालिका निवडणुकीसाठी ६५ प्रभाग आहेत. त्यातील सर्वसाधारण महिलांसाठी २१, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ९ व अनुसूचित जाती महिलांसाठी ३ अशा ३३ जागा महिलांसाठी राखीव आहेत, तर उर्वरितपैकी ३ जागा अनुसूचित जाती, ८ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग व २१ जागा सर्वसाधारणसाठी आहेत.