Kolhapur Football: कोल्हापुरात फुटबॉलची किक ऑफ नोव्हेंबरमध्ये होणार, परराज्यातील ४२ खेळाडूंचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:46 IST2025-10-20T15:45:14+5:302025-10-20T15:46:22+5:30
Kolhapur Football: गेल्या काही महिन्यांपासून फुटबॉल चाहते कोणत्या संघात कोणता खेळाडू खेळणार, याबद्दल उत्सुक होते, ती नोंदणी पूर्ण झाली

संग्रहित छाया
कोल्हापूर : फुटबॉलप्रेमींसाठी बहुप्रतीक्षित के.एस.ए. फुटबॉल लीग हंगामासाठी नोंदणी पूर्ण झाली आहे. एकूण १६ संघ आणि ३१९ खेळाडूंची नोंदणी झाली आहे. देशभरातून ४२ खेळाडूंची असून ३३ जण नवीन असून ९ जुने आहेत. श्री छत्रपती शाहू स्टेडियमची डागडुज्जी पूर्ण झाल्यानंतर फुटबॉल हंगाम सुरु होणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत फुटबॉलची किक ऑफ होण्याची अपेक्षा आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये 'ए' डिव्हिजनसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात स्थानिक आणि परराज्यातील खेळाडूंचा समावेश आहे. एकूण १६ संघ आणि ३१९ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. ४२ खेळाडू कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील असून ते गोवा, केरळ, पंजाब आणि ईशान्येकडील राज्यांमधून आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून फुटबॉल चाहते कोणत्या संघात कोणता खेळाडू खेळणार, याबद्दल उत्सुक होते, ती नोंदणी पूर्ण झाली आहे. एकूण १६ संघांपैकी १५ संघांनी प्रत्येकी २० खेळाडूंची नोंदणी केली आहे. सुभाषनगर फुटबॉल क्लबने १९ खेळाडूंची नोंदणी केली आहे. त्यामुळे एकूण ३१९ खेळाडू झाले आहेत.
परराज्यातील खेळाडूंचा समावेश
संघांत यंदा लीग स्पर्धा रंगणार आहे. या संघांकडून खेळणाऱ्या नवोदित स्थानिक, मणिपूर, केरळ, तमिळनाडू, सोलापूर, जम्मू-काश्मीर आदी राज्यांतील खेळाडू स्थानिक संघाना विजयी करणार आहेत. यातील अनेक खेळाडू आयएसएल लीगमध्ये विविध नामांकित संघांकडून खेळले आहेत.
स्टार खेळाडू
स्थानिक व बाहेरील राज्यांतील स्टार खेळाडूंच्या सहभागामुळे यंदाचा हंगाम अधिक रोमांचक ठरणार आहे. लवप्रीत, सार्थक, गुरुराज, अक्षय, सुदर्शन, पृथ्वीराज, प्रभू, मणिकंदन, स्टॅलीन, नानगमबा, ब्रह्मा, मोहम्मद, रोहन, प्रतीक, बलविंदर, फेबीन, रविराज, इतिफाक, सुबय्या, जॉन स्टार खेळाडू आहेत.