Kolhapur: आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानी.. शाही दसरा महोत्सवात लोकनृत्यांतून वैविध्यतेचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:01 IST2025-09-26T18:01:04+5:302025-09-26T18:01:26+5:30
देशातील सात राज्यांतील ११७ कलाकारांनी लोकपरंपरा आणि लोकनृत्यांचे आकर्षक सादरीकरण करून कोल्हापूरकरांना मंत्रमुग्ध केले

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : मध्य प्रदेशमधील गणगौर नृत्य, महाराष्ट्रातील सोंगी मुखवटे, तेलंगणामधील महाकाली देवीची पूजा, पश्चिम बंगालमधील छऊ नृत्य, राजस्थानमधील चरी नृत्य, रास गरबा अशा देशातील विविध प्रांतांच्या लोकनृत्यांनी ऐतिहासिक दसरा चौकात विविधतेत एकता असलेल्या देशाचे प्रतिबिंब उमटले.
देशातील सात राज्यांतील ११७ कलाकारांनी लोकपरंपरा आणि लोकनृत्यांचे आकर्षक सादरीकरण करून कोल्हापूरकरांना मंत्रमुग्ध केले. आज शुक्रवारी आराधना कार्यक्रमाचा दुसरा भार सादर होणार आहे.
भारत सरकार, सांस्कृतिक कार्यसंचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सवांतर्गत दसरा चौकात गुरुवारी आराधना भाग १ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजस्थानी कलाकारांच्या पारंपरिक चरी नृत्याने झाली. डोक्यावर पेटलेल्या ज्वाळांसह लयबद्ध हालचाली करताना कलाकारांनी कौशल्यपूर्ण सादरीकरण केले त्यानंतर सोंगी मुखवटे नृत्याने महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील आदिवासी लोककला अनुभवायला मिळाला.
मध्य प्रदेशातील नर्तकांनी झलरिया आणि मटकी गणगौर नृत्यात शिव-पार्वतीच्या प्रतिमांचे चित्रण केले. कर्नाटकच्या कलाकारांनी देवी नृत्यातून शक्तीची उपासना, भक्तिभाव आणि शौर्यपूर्ण हालचालींचा संगम सादर केला.
पश्चिम बंगालच्या कलाकारांनी छऊ नृत्य सादर करत पुराणकथांतील युद्ध आणि वीरतेचे चित्रण केले. तेलंगणातील बोनालू नृत्यातून महाकाली देवीची भक्ती बथुकम्मा नृत्यातून निसर्ग, माता आणि सृजनशक्तीचा गौरव केला. गुजरातमधील कलाकारांनी रास-गरबा केला.