कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप; पुराचे पाणी कमी होऊ लागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:58 IST2025-08-23T11:57:36+5:302025-08-23T11:58:21+5:30
जिल्ह्यातील ४४० कुटूंबे अद्याप स्थलांतरितच

ड्रोन छाया-चंद्रकांत गंगाई
कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली असून धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘वारणा’ धरणातून विसर्ग कमी झाल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी ४०.०१ फुटांपर्यंत खाली आली असून अद्याप ४३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत आहे.
कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावरील केर्ली (ता. करवीर) येथील पाणी ओसरल्याने दुपारनंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४४० कुटुंबांतील १४९१ व्यक्ती व ३७० जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळपासून चांगली उघडीप देत सूर्यनारायणाने बराच काळ दर्शन दिल्याने कोल्हापूरकरांच्या मनातील महापुराची भीती काहीसी कमी झाली. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी तुलनेत पाऊस कमी राहिला.
कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल, गडहिंग्लज तालुक्यात उघडीप राहिली.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सर्वाधिक ३० मिली मीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे.
राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद
शुक्रवारी (दि-२२) रात्री राधानगरी धरणाची सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाली आहेत. धरणातून बीओटी पॉवर हाऊस मधून १५०० क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.
तर वारणातून १६३० व दूधगंगा धरणातून ६१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील ९९ खासगी मालमत्तांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. सोमवार (दि. २५) पर्यंत जिल्ह्यात उघडीप राहील, त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जिल्ह्यातील ७६ मार्ग अद्यापही पाण्याखाली
जिल्ह्यातील ८ राज्य मार्ग, २५ प्रमुख जिल्हा मार्ग, १२ इतर जिल्हा मार्ग तर ३१ ग्रामीण मार्ग असे ७६ मार्ग अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी शुक्रवारीही कायम राहिली.
अलमट्टीचा विसर्ग २.५० लाख कायम
अलमट्टी धरणातून प्रतिसेकंद २.५० लाख तर हिपरग्गी धरणातून २.२५ लाख घनफूट पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आल्याने पाण्याचा निचरा होत आहे.
तालुकानिहाय स्थलांतरित कुटुंबे
तालुका - कुटुंबे - व्यक्ती - जनावरे
- राधानगरी - ३९ - १७४ - १२६
- कागल - १५ - ६१ - १२
- कोल्हापूर शहर - २५ - ९७ - ०
- करवीर - ६७ - ८४ - १६
- कागल (दुसरा) - ९ - ३७ - १२
- हातकणंगले - २९ - ४९ - ११६
- शिरोळ - २०९ - ८३५ - ३४
- इचलकरंजी - ३० - ९६ - ६४