बुरशींच्या पाच प्रजातींची जिल्ह्यात प्रथमच नोंद, कोल्हापुरातील संशोधकांचे यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:35 IST2025-08-09T19:34:48+5:302025-08-09T19:35:40+5:30
खाण्यायोग्य प्रजाती

बुरशींच्या पाच प्रजातींची जिल्ह्यात प्रथमच नोंद, कोल्हापुरातील संशोधकांचे यश
कोल्हापूर : ॲगॅरीकेल्स वर्गातील बुरशीच्या पाच प्रजाती महाराष्ट्रामधून प्रथमच नोंदविण्यात कोल्हापूरच्या दोन संशोधकांना यश आले आहे. यातील एका प्रजातीचे वजन हे दीड किलोपर्यंत आहे. यामधील एन्टोलोमा सेरुलाटम ही प्रजात विषारी असून ती खाण्यास अयोग्य आहे तर इतर चार प्रजाती या खाण्यायोग्य आहेत. या सर्व प्रजातींची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातून झाली आहे. यासंदर्भातील संशोधन प्रबंध ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.
पावसाळ्यात जमीन किंवा झाडांमधून अनेक बुरशी उगवत असतात, मात्र त्या दुर्लक्षित आहेत. बुरशीमधील ॲगॅरीकेल्स या वर्गातील बुरशी या अशाच दुर्लक्षित आहेत. मात्र, येथील राजाराम महाविद्यालयाच्या प्रा. अंजली पाटील आणि संशोधक विद्यार्थी सुशांत बोरनाक हे या बुरशींवर अभ्यास करतात. त्यांनी ॲगॅरीकेल्स वर्गातील १० प्रजातींची नोंद केली आहे. विशेषत: यातील पाच प्रजातींची नोंद प्रथमच कोल्हापुरातून झाली आहे.
ॲगॅरीकेल्स या वर्गातून ॲग्रोसायब पेडियाड्स, अमानिता मॅनिकाटा, बोलबिटियस कोप्रोफिलस, एन्टोलोमा सेरुलाटम, एन्टोलोमा थेक्षनागंधम, हायमेनोपेलिस रेडिकाटा, मॅक्रोसाईब गाईगॅनशीया, स्किझोफिलम कम्यून, टर्मिटोमायसेस हेमी, टर्मिटोमायसेस मायक्रोकार्पस या दहा प्रजातींची नोंद झाली आहे. अमानिता मॅनिकाटा, बोलबिटियस कोप्रोफिलस, एन्टोलोमा सेरुलाटम, एन्टोलोमा थेक्षनागंधम, मॅक्रोसाईब गाईगॅनशीया या प्रजातींची कोल्हापुरात नोंद करण्यात आली आहे.
खाण्यायोग्य प्रजाती
मॅक्रोसाईब गाईगॅनशीया ही आकाराने मोठी प्रजात असून तिचे वजन साधारण दीड किलोपर्यंत भरले. ही प्रजात आपल्याकडे खाण्यासाठी वापरली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यात सर्वात जास्त प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या जंगली अळंबींमध्ये टर्मिटोमायसेस आणि प्ल्युरोटस या प्रजातींचा समावेश असतो. टर्मिटोमायसेस ही प्रजाती सामान्यतः जंगली प्रदेशात आणि शेतीच्या जवळ आढळतात. बहुतेक वेळा ती वाळवीच्या वारुळातून उगवते म्हणूनच तिला टर्मिटोमायसेस म्हटले जाते. या व्यतिरिक्त पेडियाड्स, रेडिकोटा, हेमी आणि मायक्रोकार्पस या प्रजाती त्यांच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखल्या जातात. या बुरशींमध्ये अँटी मायक्रोबियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीकॅन्सर गुणधर्म असतात.