कोल्हापूर : शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर शहर परिसरातील ई वॉर्ड येथील मौजे कसबा करवीर येथील रि.स.नं.५८३, ५८७ व ५८८ मधील कृषी विभागाच्या ताब्यातील जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना कब्जेहक्काने देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३१ मार्चनंतर नवीन दराने जागेचे बाजारमूल्य सुमारे १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता होती. याकरिता सन २०२५ - २६ चे बाजारमूल्य तक्त्यातील दरानुसार या जमिनीचे एकत्रित मूल्यांकन ५,६०,२३,९८० इतके निश्चित करण्यात आले. अधिमूल्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ असून, त्यानंतर अधिमूल्याची रक्कम २०२६ - २७ नुसार नवीन वार्षिक बाजार मूल्यदरानुसार भरावी लागणार असल्याचे पत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास सोमवारी मिळाले. याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांना कळताच त्यांनी तत्काळ उद्योगमंत्री आणि सचिव यांच्याशी संपर्क साधत ही रक्कम तत्काळ भरण्याबाबत मंत्रालय स्तरावरून निर्देश देण्याची मागणी केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बाजारमूल्य तक्त्यातील दरानुसार जमिनीचे एकत्रित मूल्यांकन ५ कोटी ६० लाख २३ हजार ९८० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाकडे जमा केले आहेत.
साडेपाच कोटी भरले, कोल्हापुरातील आयटी पार्क जागेचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:42 IST