Kolhapur: यड्रावमध्ये यंत्रमाग कारखान्यांना आग, आगीचे कारण अस्पष्ट; सहा कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:23 IST2025-09-22T12:23:23+5:302025-09-22T12:23:48+5:30
पार्वती औद्योगिक वसाहतीमधील घटना

Kolhapur: यड्रावमध्ये यंत्रमाग कारखान्यांना आग, आगीचे कारण अस्पष्ट; सहा कोटींचे नुकसान
यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील आधुनिक स्वयंचलित यंत्रमाग कारखान्यांना भीषण आग लागली. यामध्ये यंत्रमागासह सूत, तयार कापड, बिमे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने सुमारे सहा कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबतची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या श्रीकृष्णा एक्स्पोर्ट आणि श्रीबालाजी एक्स्पोर्ट या यंत्रमाग कारखान्यांना गुरुवारी (दि. १८) मध्यरात्री आग लागल्याचे निदर्शनास आले. परिसरातील लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने या आगीमध्ये दोन्ही कारखान्यांतील दहा स्वयंचलित यंत्रमाग, यंत्रमागावर लावण्यासाठी आलेले सुताचे बीम, सुताचे कोन, तयार कापड, मशिनच्या रिपेअरिंगसाठी लागणारे ड्रॉपिंग, हिल्ड वायर, हिल्ड फ्रेम, रिड (फनी), लुम कार्ड, प्रीवाइंडर यासह साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.
आग विझविण्यासाठी झालेल्या पाण्याच्या माराने आणि धुरामुळे मोठ्या प्रमाणात कापड व सुत, वायरिंग, मोटार, ए.सी. प्लान्ट, एअर कॉम्प्रेसर पाइप लाइन, फॉल सिलिंग यासह कारखान्याची अंतर्गत व्यवस्था पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या आगीमध्ये साडेतीन कोटींचे स्वयंचलित यंत्रमाग, एक कोटींचे दुरुस्तीचे साहित्य, सूतबिम सुमारे अठरा लाख, सूत कोन दोन लाख, शिल्लक कापड अडीच लाख, तयार कापड व सूट पन्नास लाख, तसेच इतर महत्त्वाचे साहित्य व कारखान्यातील वायरिंगअंतर्गत व्यवस्था साहित्य पस्तीस लाख, असे एकूण ५ कोटी ५८ लाख २ हजार ५२५ रुपयांचे आगीमध्ये नुकसान झाले आहे.
इचलकरंजी आणि जयसिंगपूर येथील अग्निशमन पथकाने आग नियंत्रणात आणली. याबाबतची वर्दी दिनेश सत्यनारायण बांगड (वय ५६, रा.आवाडे अपार्टमेंट, इचलकरंजी) यांनी दिली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.