देवस्थान जमिनी कसणाऱ्यांचे खंड शिबिराद्वारे भरून घ्या - पालकमंत्री आबिटकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:19 IST2025-05-15T15:18:52+5:302025-05-15T15:19:31+5:30
धोरणात्मक निर्णयांसाठी पाठपुरावा करू

देवस्थान जमिनी कसणाऱ्यांचे खंड शिबिराद्वारे भरून घ्या - पालकमंत्री आबिटकर
कोल्हापूर : देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे खंड तालुकानिहाय शिबिरे भरवून भरून घ्या, खंडाची पावती त्यांना मिळाली की ते अधिकृतरित्या जमिनी कसत आहेत, यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे कर्ज मिळणे सोपे होईल. पीएम किसान, नमो किसान योजना, आपत्तींमुळे नुकसान भरपाई, जमिनीच्या सातबाऱ्यावर शेतकऱ्यांचे नाव, या धोरणात्मक निर्णयांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, उदय नारकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री आबिटकर म्हणाले, देवस्थानच्या जमिनींची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जात होती. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या जमीन कसणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे ही खरेदी-विक्री रोखणे आधी गरजेचे होते. महसूल मंत्र्यांनी त्याला मंजुरी दिल्याने या व्यवहारांना चाप बसेल. जिल्हाधिकारी येडगे यांनी खंड भरण्यासाठी शिबिरे घेतली जातील, असे सांगितले.
खंड भरण्यासाठी सर्व तालुक्यांमधील तहसील कार्यालयात शिबीर होणार आहे.
तालुका : तारीख
- राधानगरी, पन्हाळा : १९ व २० मे
- गडहिंग्लज, चंदगड : २२ व २३ मे
- आजरा, भुदरगड : २७ व २८ मे
- करवीर : २९ व ३० मे
- गगनबावडा : २ व ३ जून
- हातकणंगले : ३ व ४ जून
- शाहुवाडी : ३ व ४ जून
- कागल, शिरोळ : ९ व १० जून