तेरणीत प्रथमच चौरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:36+5:302021-01-13T05:00:36+5:30
* १३ जागांसाठी : ३८०० मतदार बजावणार मतदान तेरणी : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगतदार अशी ...

तेरणीत प्रथमच चौरंगी लढत
* १३ जागांसाठी : ३८०० मतदार बजावणार मतदान
तेरणी : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगतदार अशी होत आहे. बिनविरोध चर्चा फिसकटल्याने येथे प्रथमच चौरंगी लढत होत आहे. १३ जागांसाठी ५६ जणांनी अर्ज भरले होते. माघारीनंतर ४६ उमेदवार रिंगणात असून मुंबईकरांनी या लढतीत उडी घेतल्याने ही लढत आणखीन रंगतदार अवस्थेत गेली आहे.
राष्ट्रवादी व जनता दल यांच्यात पारंपरिक लढत असायची व अन्य पक्ष सोयीस्करप्रमाणे रिंगणात उतरायचे. यंदा मात्र चित्र वेगळे तयार झाले आहे. चार वेगवेगळ्या आघाड्या या निवडणुकीत स्थापन झाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे एक स्वतंत्र पॅनेल जनता दल, शिवसेना यांची एक आघाडी, तेरणी विकास आघाडी व मुंबईकरांचे एक स्वतंत्र पॅनेल अशी ही चौरंगी लढत होत आहे. शिवाय चार अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. चारही पॅनेल व आघाडी यांनी आपापला प्रचार जोरात चालविला आहे.
-----------------------
* चिठ्ठ्या उडविण्याचे ठरले, पण..!
दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्या-त्या वाॅर्डातील उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या उडविण्याचे ठरले असल्याचे समजते. काही करून निवडणूक लढवायची, असा निर्धार केलेल्यांना हा निर्णय न पटल्याने याला नेमक्या दिवशीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी होत आहे.