भरधाव मोटारीने पर्यटकांना उडविले, महिलेसह दोघे जखमी: टेंबे रोडवरील थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 21:04 IST2019-05-29T21:03:40+5:302019-05-29T21:04:44+5:30
कोल्हापूर शहरातील मध्यवस्तीमध्ये गजबजलेल्या टेंबे रोडवर वनवे तोडून भरधाव मोटारस्वाराने पर्यटक महिलेसह दोघांना उडविले. सुमारे पंधरा फूट फरफटत नेल्याने दोघे गंभीर जखमी झाले. पूजा श्रीनिवास पोटे (वय २८), साईराज कैलास पोटे (२१, दोघे रा. वजप, ता. कर्जत, जि. रायगड) अशी त्यांची नावे आहेत. यामध्ये एक मोपेडचालक महिलाही जखमी झाली आहे. जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

भरधाव मोटारीने पर्यटकांना उडविले, महिलेसह दोघे जखमी: टेंबे रोडवरील थरार
कोल्हापूर : शहरातील मध्यवस्तीमध्ये गजबजलेल्या टेंबे रोडवर वनवे तोडून भरधाव मोटारस्वाराने पर्यटक महिलेसह दोघांना उडविले. सुमारे पंधरा फूट फरफटत नेल्याने दोघे गंभीर जखमी झाले. पूजा श्रीनिवास पोटे (वय २८), साईराज कैलास पोटे (२१, दोघे रा. वजप, ता. कर्जत, जि. रायगड) अशी त्यांची नावे आहेत. यामध्ये एक मोपेडचालक महिलाही जखमी झाली आहे. जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, संतप्त नागरिकांनी मोटार (एमएच १३ एन ४१९३)ची तोडफोड करीत चालक प्रदीप पाटील याला बेदम मारहाण केली. कैलास पोटे यांनीच त्याला नागरिकांच्या तावडीतून सुटका करीत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने सुमारे अर्धा तास टेंबे रोडवर गर्दी झाल्याने वाहतूक ठप्प झाली. या अपघाताची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार दिलीप इदे तपास करीत आहेत.
कैलास पोटे हे अंबाबाई दर्शनासाठी कुटुंबासह बुधवारी कोल्हापुरात आले आहेत. त्यांनी टेंबे रोडवर आपली कार उभी केली होती. दर्शन घेऊन ते दुपारी जेवण करून सिंधुदुर्गला जाण्यासाठी कारकडे येण्यासाठी निघाले. त्यांच्या कुटुंबातील आठ-दहाजण रस्त्याने चालत होते. दिलबहार तालीम मंडळ चौकातून टेंबे रोडवरून मिरजकर तिकटीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती.
यावेळी टेंबे रोडवर विरोधी दिशेने आलेली मोटार शिवाजी स्टेडियमकडे जात होती. ती भरधाव आल्याने वनवेवरून जाणाऱ्या वाहनधारकांची आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. समोरून आलेली मोटार पोटे कुटुंबीयांच्या गराड्यात घुसली. यावेळी काहीजण बाजूला फेकले गेले; तर पूजा पोटे व साईराज पोटे मोटारीखाली सापडले. त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केली, तरीही चालक प्रदीप पाटील याने त्या दोघांना पंधरा फूट फरफटत नेले.
नागरिकांनी आडवे जाऊन शिवाजी स्टेडियमजवळील गाळ्याजवळ मोटार थांबविली. पूजा पोटे व साईराज पोटे यांच्या डोक्याला, हातापायाला, पाठीला गंभीर दुखापत झाली होती. नागरिकांनी या दोघांना त्यांच्याच कारमधून ‘सीपीआर’मध्ये पाठविले. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या एका महिलेची मोपेड मोटारीखाली अडकली. त्यामुळे नागरिकांची मोठी पळापळ झाली.