Kolhapur: ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू, नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 12:22 PM2024-02-24T12:22:26+5:302024-02-24T12:22:49+5:30

इचलकरंजी : येथील डेक्कन चौक परिसरात ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोडणारी पिन निघाल्याने ट्रॉलीची धडक बसून मोपेडस्वार बाप-लेकाचा मृत्यू झाला. आनंदा सोपान ...

Father and son died in tractor-trolley collision in Ichalkaranji kolhapur | Kolhapur: ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू, नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला

Kolhapur: ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू, नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला

इचलकरंजी : येथील डेक्कन चौक परिसरात ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोडणारी पिन निघाल्याने ट्रॉलीची धडक बसून मोपेडस्वार बाप-लेकाचा मृत्यू झाला. आनंदा सोपान गणपते (वय ५५) व विकास आनंदा गणपते (३०, दोघे रा. घोडकेनगर, संग्राम चौक इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.२२) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला. याबाबत मध्यरात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गणपते पिता-पुत्र कोरोची (ता.हातकणंगले) येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी मोपेड (एमएच ०९ ईवाय ७५९४) वरून गुरुवारी रात्री निघाले होते. त्याचवेळी पंचगंगा साखर कारखान्याकडून इचलकरंजीकडे मोकळी ट्रॅक्टर-ट्रॉली (केए २३ टीडी ६३२९) येत होती. डेक्कन चौक परिसरात एका दारू दुकानासमोर अचानक ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोडणारी पिन निघाली. त्यामुळे पाठीमागील ट्रॉली निखळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघालेल्या गणपते पिता-पुत्राच्या मोपेडवर आदळली.

जोराची धडक बसल्याने मोपेडसह दोघेही रस्त्यावर आपटले. त्यामध्ये विकास याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर आनंदा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना आयजीएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दोघांच्या पार्थिवावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आनंदा हे यंत्रमाग कामगार होते, तर विकास याचा वाहनांच्या स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय होता. विकास याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, या अपघाताबाबत विकास याचे मेहुणे आशिष दिगंबर डांगरे (रा. इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली आहे. मात्र, शुक्रवारी सायंकाळपर्यंत चालक सापडला नव्हता. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नाथा गळवे हे करीत आहेत.

Web Title: Father and son died in tractor-trolley collision in Ichalkaranji kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.