Fasting of unaided teachers begins | विनाअनुदानित शिक्षकांचे उपोषण सुरू

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सोमवारपासून सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देविनाअनुदानित शिक्षकांचे उपोषण सुरूशिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ठिय्या

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या माध्यमातून शिक्षकांचे आमरण उपोषण सोमवारी सुरू झाले. कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनकर्ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मारला आहे.

वीस टक्के अनुदान पात्र शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या अघोषित शाळा निधीसह घोषित कराव्यात. शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे, आदी मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीने दि. ५ आॅगस्टपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.

शासनाने या मागण्यांबाबत कोणतीही दखल घेतली नाही; त्यामुळे कोल्हापूर विभागातील सर्व ४५० विनाअनुदानित शाळा बेमुदत बंद ठेवण्यात येत आहेत. कोल्हापूर विभागातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत शुक्रवारी (दि. १६) जनआक्रोश मोर्चा काढला. त्याची दखल घेऊन सरकारने सकारात्मक कार्यवाही केली नाही; त्यामुळे समितीने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक कार्यवाही होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती कृती समितीचे उपाध्यक्ष जगदाळे यांनी दिली. दरम्यान, शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात पांडुरंग पाटील, नारायण पारखे, सचिन कांबळे हे उपोषणाला बसले आहेत.

कोल्हापूर विभागातील सुमारे १५० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यात प्रकाश पाटील, सुनील कल्याणी, नेहा भुसारी, प्रियांका वाघमारे, गजानन काटकर, आनंदा वारंग, आदींचा समावेश आहे. ‘प्रचलित नियमानुसार अनुदान मिळालेच पाहिजे’, ‘अनुदान आमच्या हक्काचे’, अशा घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला.
 

 

Web Title: Fasting of unaided teachers begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.