कोल्हापूर/पुलाची शिरोली : नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग शिरोली पुलाजवळ तब्बल तासभर रोखून धरला. पोलिसांनी प्रमुख नेत्यांसह आंदोलकांना ताब्यात घेतले, त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. आंदोलनामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. तरीही काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे हे आंदेालन करण्यात आले.जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे, दडपशाहीने शक्तिपीठ लादणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो, देणार नाही, देणार नाही एक इंचही जमीन देणार नाही, अशा अखंड घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. कृषी दिनीच शेतकरी रस्त्यावर उतरून कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ होऊ देणार नाही, असा निर्धार केला.जिल्ह्यातील विविध तालुक्यातून शेतकरी सकाळी ११ पासूनच शिरोली पुलाजवळ महामार्गावर दाखल होत राहिले. परिणामी पोलिसांनी महामार्गावरील दोन्ही बाजूचे मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. सातत्याने पडणारा पाऊस आणि पोलिसांच्या अडवणुकीवर मात करीत शेतकरी दुपारी १२ वाजता महामार्गावर उतरले. दोन्ही बाजूला रस्त्यावरच ठिय्या मारला. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह सुमारे २०० हून अधिक पोलिस बंदोबस्तात तैनात होते.रास्ता रोकोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, उद्धवसेनेचे विजय देवणे, संजय पवार, काँग्रेसचे सचिन चव्हाण, संजय पवार, बाबासाहेब देवकर, रवीकिरण इंगवले, शशांक बावचकर, राजू लाटकर, आर.के. पोवार, राहुल देसाई, शशिकांत खोत, प्रकाश पाटील, शिवाजी मगदूम, सुभाष जाधव, सम्राट मोरे, अतुल दिघे, अजित पोवार, सागर कोंडेकर, भगवान जाधव, रघुनाथ कांबळे, विक्रम पाटील, सुयोग वाडकर, बबन रानगे, युवराज गवळी, प्रवीण केसरकर, सुभाष देसाई, दयानंद कांबळे, भरत रसाळे यांच्यासह महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.
आंदोलन मागे घेण्यासाठी शेट्टी यांना नोटीसजिल्ह्यात बंदी आदेश असल्याने रास्ता रोको करू नका असे सांगून आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी सकाळीच पोलिस शिरोळ येथील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांना नोटीस दिली. यावेळी शेट्टी यांनी पोलिसांनी केलेली विनंती धुडकावून माझ्यावर गुन्हा दाखल करा पण आंदोलनात सहभागी होणारच असे सांगितले. इतरही काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती.
महायुतीचे मंत्री, आमदार यांचाही विरोध ..शक्तिपीठ महामार्ग ठेकेदाराच्या भल्यासाठी असल्याने राज्यातील १२ जिल्ह्यातून व्यापक विरोध होत आहे. महायुतीचे मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार राजेंद्र यड्रावकर, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांनी शक्तिपीठ विरोधात सरकारला पत्रे दिली आहेत. शक्तिपीठास त्यांचाही विरोध आहे, मग मुख्यमंत्री सगळ्यांची संमती आहे, असा कांगावा का करत आहेत. अशी विचारणा खासदार शेट्टी यांनी केली.
वाहतूक वळवली, कोंडी झाली..पोलिसांनी पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवली होती. मात्र पर्यायी मार्ग अरुंद आणि वाहने अधिक असल्याने दोन तासांहून अधिक काळ वाहतुकीची कोंडी झाली.
पंचगंगा नदीत उडी मारण्यासाठी गेले अन..सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित पोवार, बंंडू पाटील यांच्यासह काही कार्यकर्ते पंचगंगा नदीतील पाण्यात उडी टाकण्यासाठी पुलावर गेले. पण यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. उडी मारलीच तर सुखरूप बाहेर काढण्यासाठी पाण्यात दोन बोटीही फिरविण्यात येत होत्या. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.