शक्तिपीठसाठी शेतकऱ्यांची संमतीच, सातबाराही जमा; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:28 IST2025-07-12T11:27:44+5:302025-07-12T11:28:44+5:30

मुंबईत रस्ते महामंडळात बैठक

Farmers consent for Shaktipeeth highway Information from MLA Rajesh Kshirsagar | शक्तिपीठसाठी शेतकऱ्यांची संमतीच, सातबाराही जमा; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती 

शक्तिपीठसाठी शेतकऱ्यांची संमतीच, सातबाराही जमा; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती 

कोल्हापूर : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासंदर्भात विरोधकांकडून राजकारणासाठी विरोध सुरू आहे. हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या उन्नतीचा मार्ग ठरणार आहे, म्हणून अनेक शेतकऱ्यांचे या महामार्गास समर्थन आहे. अनेक समर्थक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला मान्यता देऊन सातबारादेखील जमा केले आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी दिली. मुंबईत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात शक्तिपीठ महामार्गसंबंधीशेतकरी, अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.

आमदार क्षीरसागर म्हणाले, महामार्गाची रुंदी ३०० मीटर नसून केवळ १०० ते ११० मीटर आहे. मात्र, विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना शेतकऱ्यांची वाहने आणि बैलगाड्यांना येण्या-जाण्यासाठी वेगळा रस्ता असणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावानुसार किंमतही दिली जाणार आहे. पूरबाधित क्षेत्रात भराव न टाकता, पिलरवर पूल बांधण्यात येतील. 

वाचा- शक्तिपीठ झाला, तर महापुराचे पाणी बिंदू चौकापर्यंत, राजू शेट्टी यांची भीती; रद्दसाठी अंबाबाईला घातले साकडे

समृद्धी महामार्ग तयार झाल्यानंतर कमीत कमी वेळेत एका गावाहून दुसऱ्या गावाला भाजीपाल्याची थेट वाहतूक होऊ लागली आहे. त्यामुळे शेतमालाला चांगली किंमत मिळत आहे. बैठकीसाठी ६० गावांतील प्रमुख लोक उपस्थित होते. त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला लोकांचा विरोध नाही, फक्त राजकारणामुळे नागरिक पुढे येत नाहीत, असे सांगितले. अनेकांनी सातबारा उताराही या बैठकीत दिला.

बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए. बी. गायकवाड, कमलाकर जगदाळे, कोल्हापूर जिल्हा शक्तिपीठ महामार्ग समर्थक समितीचे अध्यक्ष दौलतराव जाधव, बापू शिंगाडे, रुचिला बाणदार, नवनाथ पाटील, योगेश पाटील, रामचंद्र अकोलकर, बाबुराव खापरे, सूर्यकांत चव्हाण, विजय हवालदार आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers consent for Shaktipeeth highway Information from MLA Rajesh Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.