Kolhapur: तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श; शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:10 IST2026-03-21T19:09:08+5:302026-03-21T19:10:49+5:30
दोषींवर कारवाई होणार - उपअभियंता

Kolhapur: तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श; शेतकऱ्याचा मृत्यू
गारगोटी : निळपण (ता. भुदरगड) येथे तुटलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने महादेव पांडुरंग शिंदे (वय ५७) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २०) सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव शिंदे हे शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कोनवडे-निळपण रस्त्यालगत असलेल्या शेतात उसाला खत घालण्यासाठी गेले होते. याच परिसरातील राहुल घाटगे यांच्या शेतात विद्युत वाहिनी तुटून पडली होती. महादेव शिंदे शेतातून पायवाटेने जात असताना त्यांचा तुटलेल्या तारेला स्पर्श झाला. यावेळी जोरात विजेचा धक्का बसल्याने ते जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली, मुलगा, भाऊ, भावजय व पुतणे असा परिवार आहे.
दोषींवर कारवाई होणार : उपअभियंता
याबाबत महावितरणचे उपअभियंता एस. के. राऊत म्हणाले, ही घटना अत्यंत गंभीर आहे. तार तुटल्याची माहिती मिळूनही वीजपुरवठा खंडित करण्यास झालेल्या विलंबाबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. मृत शिंदे यांच्या कुटुंबाला योग्य भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.
भरपाई न दिल्यास आंदोलन : अविनाश शिंदे
उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश शिंदे म्हणाले की, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचा जीव गेला आहे. यातील दोषी कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करून शिंदे कुटुंबाला योग्य भरपाई देण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.