कोल्हापुरातील धामोडमध्ये बनावट नोटांचा सुळसळाट, बाजारपेठेत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 12:26 IST2023-07-08T11:32:46+5:302023-07-08T12:26:26+5:30
नोटा चलनात कोणी व कशा आणल्या याचा पोलिसांनी छडा लावणे गरजेचे

कोल्हापुरातील धामोडमध्ये बनावट नोटांचा सुळसळाट, बाजारपेठेत खळबळ
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड : धामोड (ता .राधानगरी ) येथील बाजारपेठेमध्ये गेल्या दोन दिवसापासून शंभर रुपयाच्या बनावट नोटा आल्याचे काही व्यापाऱ्यांना निदर्शनास आले. त्यामुळे धामोड परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या बनावट नोटा चलनात कोणी व कशा आणल्या याचा पोलिसांनी छडा लावणे गरजेचे आहे.
धामोड हे बाजारपेठेचे गाव असल्याने या गावचा परिसरातील चाळीस वाड्या -वस्त्यांशी संपर्क असतो. आज सकाळी येथील काही व्यावसायिकांच्या चलनामध्ये शंभर रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. तेव्हा काही व्यावसायिकांनी एकमेकाकडे विचारना करताच चलनात नोटा असल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्यात आज आठवडी बाजार असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. धामोड ही मोठी बाजारपेठ आहे. त्यात येथे आठवडी बाजाराच्या निमित्ताने कोल्हापूर पासून ते कर्नाटक पर्यंतचे अनेक व्यापारी येत असतात.
येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, दोन मोठे व्यापारी मंडळे, पतसंस्था असल्याने दर दिवसा लाखो रुपयाची उलाढाल होत असते. त्यामुळेच काही अज्ञातानी या नोटा या बाजारपेठेमध्ये खपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन या नोटा कोणी व कशा खपवल्या याचा तपास होणे गरजेचे आहे.