Kolhapur: बोगस बांधकाम कामगार पोलीस चौकशीच्या फेऱ्यात, एजंट रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:39 IST2025-08-01T17:39:05+5:302025-08-01T17:39:22+5:30

व्याप्ती वाढण्याची शक्यता 

Fake construction worker under police investigation agent on radar | Kolhapur: बोगस बांधकाम कामगार पोलीस चौकशीच्या फेऱ्यात, एजंट रडारवर

Kolhapur: बोगस बांधकाम कामगार पोलीस चौकशीच्या फेऱ्यात, एजंट रडारवर

कोल्हापूर : बोगस बांधकाम कामगारांच्या नावे बनावट दाखले सादर करून ४४ लाख ७७ हजारांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल झालेल्या २५ जणांना चौकशीसाठी बोलवले आहे. शुक्रवारपासून (दि. १) चौकशीला सुरुवात होणार आहे. फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून, बोगस कामगारांच्या नोंदी करणारे एजंट शोधून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे, मृत्यूचे बनावट दाखले आणि बांधकाम कामगार असल्याचे खोटे दाखले सादर करून काही बोगस बांधकाम कामगारांनी शासनाच्या कल्याणकारी मंडळाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात २५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक सागर गुणवरे याचा तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांना त्यांनी चौकशीसाठी बोलवले आहे. 

शुक्रवारपासून त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यांनी कल्याणकारी मंडळांकडे सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यांना बनावट कागदपत्रे देणाऱ्यांचीही चौकशी केली जाईल, अशी माहिती उपनिरीक्षक गुणवरे यांनी दिली. गुन्हा दाखल झालेल्या यादीत बहुतांश नावे कागल तालुक्यातील आहेत. या परिसरातील ठेकेदारांचाही शोध घेऊन चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

बनावट प्रमाणपत्रे देणारे कोण?

काही बांधकाम ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांनी ९० दिवस काम केल्याचे खोटे दाखले बोगस कामगारांना दिल्याची माहिती तपासातून समोर येत आहे. काही बोगस कामगारांना ७५ टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देण्यात शासकीय रुग्णालयापासून ते एजंटपर्यंत मोठी साखळी कार्यरत असल्याचा संशय आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी गुणवरे यांनी दिली.

Web Title: Fake construction worker under police investigation agent on radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.