गॅस पाईपलाईन जोडणीच्या दिवशीच स्फोट; कोल्हापुरात दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:27 IST2025-08-26T12:27:09+5:302025-08-26T12:27:09+5:30

गॅस पुरवठा कंपनी विरोधात संताप

Explosion on the day of gas pipeline connection Four people including two children seriously injured in Kolhapur | गॅस पाईपलाईन जोडणीच्या दिवशीच स्फोट; कोल्हापुरात दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी

गॅस पाईपलाईन जोडणीच्या दिवशीच स्फोट; कोल्हापुरात दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी

कोल्हापूर : घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले. हा प्रकार सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास कळंबा कारागृहाच्या पाठीमागील एलआयसी कॉलनीतील मनोरंभ कॉलनीत झाला. 

अनंत भोजणे (वय ६०), शीतल अमर भोजणे (२९), प्रज्ज्वल अमर भोजणे (साडेपाच वर्षे) आणि इशिका अमर भोजणे (३) अशी जखमींची नावे आहेत. स्फोट आणि आगीत दोन घरातील प्रापंचिक साहित्याचे सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मनोरंभ कॉलनीत राहणारे अमर भोजने हे शहरातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी ते कामावर गेले होते. त्यावेळी त्यांचे वडील अनंत, पत्नी शीतल आणि दोन्ही मुले घरात होती. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या घरात गॅस पुरवठा करणारी पाईपलाईन आणि मीटरची जोडणी केली होती. मात्र, गॅस पुरवठा सुरू केला नव्हता. रात्री पावणेअकराच्या सुमारास अचानक घरात स्फोट झाला. स्फोट एवढा भयानक होता की खिडकीच्या काचा फुटून समोरच्या घरात आगीच्या झळा पोहोचल्या तसेच प्रापंचिक साहित्याचे जळून नुकसान झाले. 

स्फोटामुळे घरातील पडदे जळाले. छताचे सिलिंग आणि भिंतीचे प्लास्टर निघाले. आगीने पेट घेतलेल्या अवस्थेत अनंत भोजने आणि शीतल भोजने हे घरातून बाहेर पळत आले. हा प्रकार लक्षात येताच गल्लीतील राजेश्वरी सचिन देशमाने, रमेश पाटील, रविना पाटील यांनी अंगावर ब्लँकेट टाकून दोघांची आग विझवली तसेच घरात अडकलेला प्रज्वल आणि इशिका या दोघांना बाहेर काढले. खासगी वाहनातून त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

पंधरा मिनिटांत आग विझवली

वर्दी मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आग विझवली. या आगीत भोजने यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले तसेच समोरचे रमेश पाटील यांच्या घराचे एक ते दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. स्टेशन ऑफिसर जयवंत खोत, संग्राम मोरे, प्रवीण ब्रह्मदंडे, मोहसीन पठाण, संभाजी ढेपले, विक्रम कुंभार आणि सागर पाटील यांनी आग विझविली.

गॅस पुरवठा कंपनी विरोधात संताप

घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने सोमवारीच या परिसरात मीटर जोडणीचे काम सुरू केले. गॅस जोडणी केलेल्या पहिल्या घरात पहिल्याच दिवशी दुर्घटना घडल्याने गॅस पुरवठा कंपनी विरोधात नागरिकांनी प्रचंड संपात व्यक्त केला. मीटर जोडणी पूर्ण झाल्याशिवाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गॅस पुरवठा कसा सुरू केला? असा सवाल या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मयूर भोसले यांनी व्यक्त केला.

Web Title: Explosion on the day of gas pipeline connection Four people including two children seriously injured in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.