Mahaparinirvan Din 2025: माणगाव परिषदेचा डंका जगभर, हॉलीग्राफ शो मात्र बंद स्थितीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:07 IST2025-12-06T12:06:05+5:302025-12-06T12:07:05+5:30
छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव येथे १९२० मध्ये परिषद झाली होती. ही परिषद डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक व राजकीय कारकिर्दीची सुरुवात ठरली, ज्यामुळे या परिषदेला ऐतिहासिक महत्त्व

Mahaparinirvan Din 2025: माणगाव परिषदेचा डंका जगभर, हॉलीग्राफ शो मात्र बंद स्थितीत
अभय व्हनवाडे
रूकडी/माणगाव : १९२० साली माणगाव येथे झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेचा डंका जगभर पसरला असतानाही, याच ठिकाणी उभारण्यात आलेला ऐतिहासिक हॉलीग्राफ शो गृह बंद अवस्थेत आहे. शासनाची उदासीन भूमिका आणि एजन्सी यांच्यात समन्वयाअभावी या ऐतिहासिक स्मारकाकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य तसेच परराज्यातून येणाऱ्या परिषद अभ्यासकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव येथे १९२० मध्ये परिषद झाली होती. ही परिषद डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक व राजकीय कारकिर्दीची सुरुवात ठरली, ज्यामुळे या परिषदेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
शासनाने स्मारकासाठी व लंडन हाऊससाठी दोनशे कोटी रुपये निधीची घोषणा केली होती.
यासाठी एजन्सी नेमण्यात आली आणि दोन कोटी रुपये निधीही दिला. परिषदेविषयी अभ्यासकांना माहिती देण्यासाठी येथे हॉलीग्राफ शो इमारत, ५०० चौरस फुटांचा चित्रपटगृह आणि शेजारील लंडन हाऊस स्थित इमारतीची प्रतिकृती उभारण्यात आली. सध्या हाॅलीग्राफ शो चालवण्यासाठी प्रशिक्षित सेवक उपलब्ध नसल्यामुळे आणि लंडन हाऊस इमारतीची स्वच्छता नसल्यामुळे या इमारतींची दुरवस्था होत आहे.
या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २०२४ मध्ये झाले होते. मध्यंतरी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भेट देऊन असुविधेबद्दल नाराजी व्यक्त केली, पण बार्टी तसेच सामाजिक न्याय विभाग या इमारतीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ऐतिहासिक ठिकाणाची दुरवस्था होत आहे.
ग्रामपंचायत आणि सामाजिक न्याय विभाग यांनी या स्मारकांसाठी समन्वय भूमिका पार पाडावी. हाॅलीग्राफ शोसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. - अनिल कांबळे (माणगावकर)
हाॅलीग्राफसाठी मनुष्यबळ देण्यास तयार आहोत. मात्र, एजन्सी आणि शासन यांच्यात निधी हस्तांतरणाबाबत पूर्तता न झाल्यामुळे एजन्सी प्रशिक्षण देण्यास टाळाटाळ करत आहे. - राजू मगदूम सरपंच