Kolhapur- Balumama Temple Adamapur: न्यायप्रविष्ट जमिनीच्या संचकारपत्रास २५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:58 IST2025-10-11T18:57:33+5:302025-10-11T18:58:04+5:30
कायदेशीर प्रक्रिया न अवलंबताच केले व्यवहार

Kolhapur- Balumama Temple Adamapur: न्यायप्रविष्ट जमिनीच्या संचकारपत्रास २५ लाख
शिवाजी सावंत
गारगोटी : आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिराच्या सुविधांसाठी घेतलेल्या जमिनीचे वाद न्यायप्रविष्ठ असताना देखील २५ लाख २३ हजार ९५० रुपये देऊन त्यांच्याशी संचकारपत्र करण्यात आले आहे. याशिवाय जमीन तहसीलदार एनए असताना भूखंड असल्याचे दाखवून संचारकारपत्र केले आहे. आदमापूर येथील गट क्रमांक १८६/१,१८६/२,१८७,१८८,१८९ या गटामधील १३५.३४ गुंठे जमिनी देवस्थानसाठी खरेदी करण्यासाठी भूखंड दाखवून त्या दराने खरेदी केल्या आहेत.त्यामध्ये गट क्रमांक १८६/२ गटातील ३७.३४ गुंठे जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात लढा सुरू आहे.
न्यायप्रविष्ठ असलेल्या या जमिनीचे संचकारपत्र करण्यात आले आहे. यामध्ये तत्कालीन कार्याध्यक्षा रागिणी खडके आणि सचिव संदीप मगदूम यांचा समावेश आहे. याबाबत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नामदेव खेबुडे आणि इतर सहाजण यांनी तक्रार केली आहे. कोणत्याही जमिनी खरेदी करताना विश्वस्तांच्या बैठकीत बहुमताने ठराव मंजूर करून घेतलेला नाही. मंजूर ठरावास धर्मादाय उपायुक्त यांच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर केलेले नाहीत.
वाचा : बाळूमामा देवस्थानने रस्ता नसताना वाहनतळासाठी निढोरीत घेतली जागा
भूमी अभिलेख कार्यालयाच्या "सी" प्रतिनुसार क्षेत्रनिहाय खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.त्यामुळे या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर दोषारोप दाखल करावेत. कार्याध्यक्ष सचिव यांना पदमुक्त करून त्यांच्यावर पैशांच्या अपव्ययाची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी तक्रारदारांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे केली आहे.
याबाबत तत्कालीन कार्याध्यक्षा रागिणी खडके यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, या जमिनीचे संचकारपत्र करताना रीतसर अग्रगण्य दैनिकात प्रसिद्धी देण्यात आली होती. त्यावेळी या मालकी हक्काच्या दाव्याबाबत कोणतेही लेखी पत्र अथवा हरकत आलेली नाही.त्यामुळे सर्व व्यवहार कायदेशीर अटी व शर्तीची पूर्तता करून व पारदर्शी केला आहे.
देवस्थानच्या नजीक असलेल्या या जमिनी बाजारभावापेक्षा कमी भावाने खरेदी केल्या आहेत. याची माहिती असतानाही ज्यांनी तक्रार दाखल केली आहे, त्यातील कोणाचे नेमके कोणते हितसंबंध गुंतले होते ? याची माहिती परिसरातील लोकांना आहे. माझ्या काळात पारदर्शी व्यवहार सुरू केल्याने मला तेथून हटवण्यासाठी कोणी काय-काय केले, हे जगजाहीर आहे.
कुणाला किती संचकार..?
नामदेव खेबुडे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, पदाधिकाऱ्यांनी १८६/२ गटातील १. रेखा भाट : ७ लाख ५० हजार ७५० २. जितेंद्र भाट : ६ लाख ७ हजार ७५० आणि ३. सुभाष ढेरे : ११ लाख ६५ हजार ४५० रुपये धनादेशद्वारे ४ आणि ५ मे २०२५ ला अदा केले आहेत. याशिवाय अन्य सहा भूखंडधारकांना देखील रकमा दिल्या आहेत.