खासदार होऊन दीड वर्षे झाली तरी दिल्लीत घर नाही, शाहू छत्रपतींनी मराठा महासंघाच्या मेळाव्यात व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:04 IST2025-09-29T13:03:50+5:302025-09-29T13:04:12+5:30
'माझ्या या अनुभवावरूनच मराठा भवनचे महत्त्व काय आहे, हे मला समजले'

खासदार होऊन दीड वर्षे झाली तरी दिल्लीत घर नाही, शाहू छत्रपतींनी मराठा महासंघाच्या मेळाव्यात व्यक्त केली खंत
कोल्हापूर : मी खासदार होऊन दीड वर्षे झाले; परंतु मला अजूनही दिल्लीत घर मिळालेले नाही. त्यामुळे मला महाराष्ट्र सदनात राहावे लागते, अशी खंत खासदार शाहू छत्रपती यांनी रविवारी व्यक्त केली. मराठा महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी हा प्रकार सांगितला आणि सर्वांनाच आश्चर्य वाटले.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यादेखतच शाहू छत्रपती यांनी ही खंत व्यक्त केली. मराठा महासंघाच्या या मेळाव्यात शाहू छत्रपती यांच्या भाषणाविषयी उत्सुकता होती. कोल्हापुरातील मराठा भवनाबाबत भाष्य करताना शाहू छत्रपती म्हणाले, हे भवन होणे अत्यावश्यक आहे. याच पद्धतीने मुंबई आणि दिल्लीतही मराठा भवन असावे. जेणेकरून मराठा समाजातील लोक तेथे गेल्यानंतर भवनमध्ये त्यांची राहण्याची सोय होईल. हे मत व्यक्त करतानाच त्यांनी स्वत:बद्दलचा हा गौप्यस्फोट केला. माझ्या या अनुभवावरूनच मराठा भवनचे महत्त्व काय आहे, हे मला समजले आहे, अशीही पुष्टी शाहू छत्रपती यांनी जोडली.
का घर दिले नसावे?
दीड वर्षात पहिल्यांदाच खासदार शाहू छत्रपती यांना दिल्लीत घर नसल्याची माहिती या मेळाव्याच्या निमित्ताने सांगितली. त्यामुळे राज्यभरातून आलेल्या मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त करत दिल्लीत खासदारांना घर का दिले नसावे, याबाबत पत्रकारांकडे विचारणा केली.