तांत्रिक अडचणी दूर करा, अन्यथा आंदोलन, पवित्र पोर्टलबाबत ‘नौजवान सभे’चा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:02 IST2019-05-28T11:01:51+5:302019-05-28T11:02:57+5:30
पवित्र पोर्टलबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करा. या पोर्टलवर माहिती भरण्यासाठी मुदतवाढ द्या, अन्यथा बुधवार (दि. २९) पासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय नौजवान सभा या संघटनेच्या वतीने देण्यात आला. त्याबाबतचे निवेदन संघटनेने साहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांना दिले.

तांत्रिक अडचणी दूर करा, अन्यथा आंदोलन, पवित्र पोर्टलबाबत ‘नौजवान सभे’चा इशारा
कोल्हापूर : पवित्र पोर्टलबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करा. या पोर्टलवर माहिती भरण्यासाठी मुदतवाढ द्या, अन्यथा बुधवार (दि. २९) पासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय नौजवान सभा या संघटनेच्या वतीने देण्यात आला. त्याबाबतचे निवेदन संघटनेने साहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांना दिले.
शिक्षक भरतीसाठी राज्य सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कार्यवाही सुरू केली आहे. पोर्टलवर उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेण्याची प्रक्रिया दि. २२ मेपासून सुरू झाली. या पोर्टलबाबत उमेदवारांमध्ये राज्यभर संभ्रमावस्था आहे. त्या दूर करण्याऐवजी त्यामध्ये भर घालण्याचे काम करीत आहे. त्याबाबत काही मागण्या संघटना करत आहेत. त्यात डी. एड., बी. एड., पदवीधारकांची एकूण संख्या १0 लाखांहून अधिक आहे; मात्र, पवित्र पोर्टलद्वारे केवळ १२ हजार जागांच्या शिक्षकांची भरती शासन करत आहे.
उर्वरित सर्व जागांची भरती शासनाने दुसऱ्या फेरीतून जून, जुलैमध्ये त्वरित करावी. भरती होत असलेल्या एकूण जागांपैकी काही जागा खाजगी अनुदानित संस्थांमध्ये भरल्या जाणार आहेत. या जागांकरिता १ : १० मुलाखतीसाठी पात्र करून मुलाखत संस्थाचालक घेण्याची तरतूद केली आहे; त्यामुळे संस्था चालकांकडून उमेदवारांत नोकरीसाठी पैसे घेण्याची दाट शक्यता आहे. शासनाने मुलाखतीची तरतूद रद्द करावी.
पोर्टलमध्ये उमेदवारांची माहिती भरण्यामध्ये, वयाच्या अटीमध्ये, दिव्यांगांच्या आरक्षणासाठी व इतर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत; त्यामुळे दि. ३१ मे रोजीपर्यंत माहिती भरायची मुदत आहे. या मुदतीमध्ये वाढ करावी. तांत्रिक मुद्यांचे निराकारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत कक्ष सुरू करावा. वयोमर्यादा शिथिल करावी. शासनाकडून शिक्षक, विद्यार्थी प्रमाण हे शिक्षण हक्क कायद्यानुसार लागू करावे, आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
या शिष्टमंडळात गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, आरती रेडेकर, राम करे, संतोष आयरे, जावेद तांबोळी, सयाजी गुरव, संतोष पोवार, बाळाताई ठाणेकर, स्वाती तावडे, प्रतापराव यादव, कौसर शिकलगार, महेंद्र ठाणेकर, आदींचा समावेश होता. दरम्यान, निवेदन देण्यापूर्वी बिंदू चौकातील रेडफ्लॅग बिल्ंिडगमध्ये संघटनेची बैठक झाली. त्यामध्ये आंदोलन करण्याबाबत चर्चा झाली.
पाठपुरावा केला जाईल
दरम्यान, निवेदन दिल्यानंतर साहाय्यक शिक्षण संचालक चौगुले म्हणाले, या उमेदवारांनी निवेदनाद्वारे केलेल्या तक्रारी, मागण्या गंभीर आहेत. हे निवेदन शिक्षण आयुक्तांकडे पाठवून त्याबाबत पाठपुरावा केला जाईल.