Kolhapur: मुरगूडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, अकरा जणांचा घेतला चावा; मतदानादिवशीच घटना घडल्याने गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:38 IST2025-12-02T14:35:45+5:302025-12-02T14:38:30+5:30
मुरगूड : मुरगूड येथे नगरपरिषदेचे मतदान शांततेत सुरू असताना मुख्य बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. या कुत्र्याने तब्बल अकरा ...

Kolhapur: मुरगूडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, अकरा जणांचा घेतला चावा; मतदानादिवशीच घटना घडल्याने गोंधळ
मुरगूड : मुरगूड येथे नगरपरिषदेचे मतदान शांततेत सुरू असताना मुख्य बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. या कुत्र्याने तब्बल अकरा जणांचा चावा घेतला असून यात काहीजण गंभीर जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडताच काही उमेदवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. या घटनेने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असल्याने मुरगूड बाजारपेठेत गर्दी होती. दरम्यानच, राजीव गांधी चौकात पिसाळलेला कुत्रा नागरिकांच्या अंगावर जात होता. परिसरात तब्बल अकरा जणांचा या कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये विठ्ठल दशरथ वायदंडे (वय १९), विश्वजीत उमाजी वायदंडे (रा. मळगे), आशिष बाळासाहेब देवळे (२८), कमल रघुनाथ सूर्यवंशी (७५), राजाराम बळवंत कडवे (६०), नंदिनी गजेंद्र भोसले (१४), कमल तानाजी चित्रकार (४२), रसिका आंबिदास गोंधळी(१५), बापू इलाप्पा कांबळे (६५), संगीता शिवाजी चांदेकर (५५), समीक्षा शंकर पाटील (१५, सर्व रा. मुरगुड) हे जखमी झाले.
काही जणांच्या जखमा खोलवर आहेत. यातील काही रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवले आहे. यावेळी काही उमेदवारांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. ही घटना समजताच अनेकांनी त्या कुत्र्याचा पाठलाग केला. काहींनी लोकांना आरडाओरडा करून सावध केले शेवटी काही तरुणांनी या कुत्र्याचा बंदोबस्त केला.