Kolhapur News: माडवळेत हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ, ऊसशेतीचे नुकसान; ग्रामस्थांमध्ये भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 12:21 IST2023-02-03T12:21:08+5:302023-02-03T12:21:35+5:30
तो ‘टस्कर’ तळेवाडी-अर्जुनवाडीच्या जंगलात

Kolhapur News: माडवळेत हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ, ऊसशेतीचे नुकसान; ग्रामस्थांमध्ये भीती
चंदगड : माडवळे गावात पार्शी वाड्यालगत उसाच्या शेतात हत्तींच्या कळपाने बुधवारी (दि. १) रात्री दहाच्या सुमारास धुमाकूळ घातला आहे. हत्तींच्या कळपाने पांडुरंग रामा दळवी, म्हात्रू कृष्णा पार्शी यांच्या ऊसपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा कळप पुढे हाजगोळी मार्गे कर्नाटक हद्दीत धामणे गावाकडे निघून गेल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
बुधवारी रात्री पाच हत्तींचा कळप कोदाळी, धनगरवाड्यावरून माडवळे गावाजवळील पार्शी वाड्याच्या परिसरात आला. याबाबतची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी हत्तीच्या कळपाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा कळप पुढे हाजगोळी मार्गाने कर्नाटक हद्दीत निघून गेला आहे.
नारायण वैजू गावडे व वनरक्षक प्रकाश शिंदे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. अथर्व-दौलत साखर कारखान्याचे शेतीगट अधिकारी यांनी नुकसान केलेल्या उसाची पाहणी केली. यावेळी नेमाणा गावडे, सुरेश पार्शी, जोतिबा गावडे, संतोष गावडे, गणपत पवार, रवळू गावडे, शिवराज दळवी, मारुती मसूरकर, गोविंद पार्शी, शेतकरी उपस्थित होते.
पाटणे वनविभागाच्या हद्दीत हत्तींचा वावर कायम असून कोदाळी, धनगरवाडा, जंगमहट्टी, माडवळे, पार्शीवाडा, हाजगोळी मार्गे कर्नाटक हद्दीत असा त्यांचा मार्ग आहे. त्यामुळे दरवर्षी हा कळप या परिसरात येतो. मात्र, अशावेळी ग्रामस्थांनी त्यांना त्यांच्या मार्गे जाऊ द्यावे, जेणेकरून नुकसान कमी होईल. या कळपाला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात हा कळप अधिक बिथरतो आणि आसपासच्या शेताचे नुकसान करतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवून हत्तींना आपल्या मार्गे जाऊ द्यावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
तो ‘टस्कर’ तळेवाडी-अर्जुनवाडीच्या जंगलात
नेसरी : नेसरी-तळेवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान करून धुमाकूळ घालणाऱ्या टस्कर हत्तीने तळेवाडी-अर्जुनवाडी जंगलात ठाण मांडले आहे. वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी त्याच्या मागावर असून, बुधवारी (दि. १) रात्री अर्जुनवाडीतील शेतकऱ्यांच्या ऊसपिकाचे हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
टस्करने तळेवाडीतील शशिकांत देसाई यांच्या घरासमोर लावण्यात आलेला ट्रॅक्टर, प्रकाश देसाई यांची गवत गंजी व बहिर्जी देसाई यांच्या नारळांच्या झाडांचे, काशीलिंग मंदिर परिसरातील नदीघाटावर बसविण्यात आलेल्या विद्युत मोटारी, वायरिंग, बॅरेल, नेसरी-डोणेवाडी दरम्यान घटप्रभा नदीवरील होडीसह पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे नदीत पडलेल्या मोटारी व बॅरल काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काही विद्युत मोटारी तर ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आल्या.
नदीघाट परिसरात झालेल्या नुकसानाची सरपंच गिरिजादेवी शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. आजरा वनक्षेत्रपाल स्मिता डांगे, वनपाल प्रकाश वारंग, संजय नीळकंठ, वनरक्षक सुनील भंडारे यांनी हत्तीकडून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपसरपंच प्रथमेश दळवी, डोणेवाडी सरपंच सिकंदर मुल्ला, उपसरपंच रंगराव नाईक, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील, आदी उपस्थित होते.