पाऊस, पुराचे कारण; सोळा साखर कारखान्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:04 IST2022-06-16T16:04:27+5:302022-06-16T16:04:50+5:30
संचालकांना मुदतवाढ द्यायची तरी किती? अशी विचारणा सभासदांमधून होत आहे.

पाऊस, पुराचे कारण; सोळा साखर कारखान्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात जुलै, ऑगस्टमध्ये पडणारा पाऊस, संभाव्य पूरस्थिती पाहता, विभागातील साखर कारखान्यांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घ्याव्यात, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विभागातील पात्र सोळा साखर कारखान्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता असून सप्टेंबरनंतरच प्रक्रिया सुरू करण्याबाबत हालचाली आहेत. हे जरी खरे असले तरी, संचालकांना मुदतवाढ द्यायची तरी किती? अशी विचारणा सभासदांमधून होत आहे.
कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्च २०२० पासून लांबणीवर टाकण्यात आल्या. जवळपास दीड वर्ष कोरोनात गेल्याने ऑक्टोबर २०२१ नंतर संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली. दूध, विकास, पतसंस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. याच कालावधीत जिल्हा बँक, ‘गोकुळ’ यासारख्या शिखर संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर विभागातील सात कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली.
अजून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जवळपास १३ साखर कारखाने निवडणुकीस पात्र होते. त्यातील ‘कुंभी’, ‘आप्पासाहेब नलवडे’, ‘राजारामबापू’, ‘निनाईदेवी’ या कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया प्रारूप यादी, हरकती येथेपर्यंत सुरू आहे. अद्याप पाऊस नसला तरी, जुलै, ऑगस्टमध्ये कोल्हापूर जिल्हा व सांगलीतील काही तालुक्यांत धुवाधार पाऊस असतो. पाऊस व पूरस्थिती या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुका घेणे अवघड आहे. त्यामुळे या कारखान्यांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घ्या, अशी मागणी काही कारखान्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
कार्यक्षेत्रातील पर्जन्यवृष्टीची माहिती प्राधिकरणाकडे
साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांतील जुलै, ऑगस्टमधील पर्जन्यवृष्टी व पुराची स्थिती काय, याबाबतची माहिती प्राधिकरणाला देण्याची तयारी काही साखर कारखान्यांनी केली आहे.
पावसाळ्यानंतर ‘बिद्री’चे रणांगण
कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखाने निवडणुकीस पात्र आहेत. त्यांची निवडणूक लांबणीवर गेली, तर पावसाळ्यानंतर ‘बिद्री’ साखर कारखान्याचे रणांगण सुरू होणार आहे. या सगळ्यामुळे निवडणूक यंत्रणेवर ताण येणार हे निश्चित आहे.
हे कारखाने आहेत निवडणुकीस पात्र
कारखाना मुदत संपल्याचा दिनांक
राजाराम, कसबा बावडा २० एप्रिल २०२०
माणगंगा, आटपाडी २८ मे २०२०
राजारामबापू, वाळवा २९ मे २०२०
निनाईदेवी, शिराळा ५ ऑगस्ट २०२०
कुंभी, कुडित्रे २८ डिसेंबर २०२०
नलवडे, गडहिंग्लज २९ मार्च २०२१
शेतकरी, मिरज १७ एप्रिल २०२१
सह्याद्री, धामोड १९ एप्रिल २०२१
क्रांती, कुंडल ६ मे २०२१
इंदिरा, तांबाळे १६ मे २०२१
वसंतदादा, मिरज २२ मे २०२१
आजरा, गवसे २३ मे २०२१
हुतात्मा, वाळवा १६ एप्रिल २०२२
भोगावती, परिते २४ एप्रिल २०२२
गायकवाड, बांबवडे १ मे २०२२
सर्वाेदय, कारंदवाडी २१ जून २०२२