कोल्हापूर, हातकणंगलेसाठी पृथ्वीराज चव्हाण निवडणूक निरीक्षक; काँग्रेसची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु
By विश्वास पाटील | Updated: August 5, 2023 23:19 IST2023-08-05T23:19:07+5:302023-08-05T23:19:50+5:30
या नियुक्ती जाहीर करून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे मानण्यात येते.

कोल्हापूर, हातकणंगलेसाठी पृथ्वीराज चव्हाण निवडणूक निरीक्षक; काँग्रेसची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु
कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेसनेलोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून शनिवारी नियुक्ती केली. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी व रायगड जिल्हा निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. इचलकरंजी काँग्रेसचे शहराध्यक्ष शशांक बावचकर यांची रत्नागिरी मतदारसंघासाठी, कोल्हापूर साठी अभय छाजेड आणि हातकणंगले साठी रणजित देशमुख यांची समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे.
या नियुक्ती जाहीर करून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे मानण्यात येते. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत बुधवारी राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्या बैठकीत लोकसभा क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती मिळावी याकरता निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून या नियुक्ती करण्यात आल्या.
नियुक्त झालेले निरीक्षक व समन्वयक यांनी संबंधित जिल्हाध्यक्ष यांच्याशी समन्वय साधून ७ ते १४ ऑगस्ट दरम्यान निरीक्षकांच्या लोकसभा क्षेत्राचा विधानसभानिहाय दौरा व बैठकीचे नियोजन करून लोकसभा क्षेत्रातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटना विभाग व सेलचे जिल्हा पदाधिकारी यांना बैठकीत निमंत्रित करून तसा अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवण्याचा आहे.