कोल्हापुरात कोरोनाने वृद्धेचा मृत्यू; नव्या दोन रुग्णांची भर, एकूण रुग्ण किती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:18 IST2025-06-02T13:18:06+5:302025-06-02T13:18:58+5:30

पीपीई किट नसल्याची अफवा

Elderly man dies of Corona in Kolhapur Two new patients added | कोल्हापुरात कोरोनाने वृद्धेचा मृत्यू; नव्या दोन रुग्णांची भर, एकूण रुग्ण किती.. वाचा

कोल्हापुरात कोरोनाने वृद्धेचा मृत्यू; नव्या दोन रुग्णांची भर, एकूण रुग्ण किती.. वाचा

कोल्हापूर : कोरोना संसर्ग झालेल्या एका ७३ वर्षीय वृद्धेचा रविवारी (दि. १) उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. कोरोनाबाधित वृद्धा मूळची पलूस (जि. सांगली) येथील असून, सध्या ती पाचगाव (ता. करवीर) येथील नातेवाइकांकडे आली होती. महापालिका प्रशासनाने पंचगंगा स्मशान घाट येथे वृद्धेवर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, आणखी २ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १२ एवढी झाली.

सीपीआर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाचगाव येथील कोरोनाबाधित वृद्धेवर चार दिवसांपासून सीपीआरमधील कोरोना उपचार विभागात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला मधुमेह, किडनी विकारासह अन्य आजार होते. सीपीआर आणि महापालिका प्रशासनाने नातेवाइकांना कल्पना देऊन तिच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, महापालिका क्षेत्रातील नव्या दोन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १२ एवढी झाली. त्यापैकी ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ५ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली.

पीपीई किट नसल्याची अफवा

कोरोनाबाधित वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करणा-या महापालिकेच्या कर्मचा-यांना पीपीई किट नाहीत. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी अंत्यसंस्कार करण्यास तयार नसल्याच्या अफवा सोशल मीडियातून व्हायरल झाल्या होत्या. महापालिकेने याबाबत तातडीने खुलासा करून महापालिकेकडे पुरेसे पीपीई किट असल्याचे स्पष्ट केले. तसेच पीपीई किट घालून मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्याचे फोटो प्रसिद्ध केले.

Web Title: Elderly man dies of Corona in Kolhapur Two new patients added