Hasan Mushrif ED Raid: मुश्रीफांवरील ईडीची कारवाई निषेधार्ह - आमदार सतेज पाटील
By विश्वास पाटील | Updated: January 11, 2023 16:00 IST2023-01-11T15:59:25+5:302023-01-11T16:00:22+5:30
ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने कसा वापर केला जातो, याचे हे उदाहरण

Hasan Mushrif ED Raid: मुश्रीफांवरील ईडीची कारवाई निषेधार्ह - आमदार सतेज पाटील
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे आणि निषेधार्ह आहे अशी टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
ते म्हणाले, केवळ सूडबुद्धीने केलेली ही कारवाई निश्चितच निषेधार्ह आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून अशा खेळी करून केला जात आहे. आमदार मुश्रीफ यांच्यावर झालेली ईडीची कारवाई झाली हा सर्व प्रकार पूर्व नियोजित होता हे स्पष्ट आहे.
ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने कसा वापर केला जातो, याचे आजची ही कारवाई म्हणजे एक उदाहरण आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी आज पहाटे ईडीने छापा टाकला. सुमारे 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू आहे. दरम्यान, ईडीच्या छापेमारीची बातमी सर्वत्र होताच नागरिकांनी मुश्रीफांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. संतप्त कार्यकर्त्यांची यावेळी पोलिसांशी बाचाबाची देखील झाली. गडहिंग्लज, कागल, मुरगूडमध्ये बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र मुश्रीफांनी सर्व व्यवहार सुरु ठेवण्याचे नागरिकांनी आवाहन केले.
कारवाईबाबत मुश्रीफ यांचा थेट सवाल
एका व्हिडिओच्या माध्यमातून मुश्रीफांनी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं. तसेच, एका विशिष्ठ जाती-धर्माच्या व्यक्तींवरच कारवाई होतेय का? असा प्रश्नही उपस्थित केला. वास्तविक ३० ते ३५ वर्षातील माझं सार्वजनिक क्षेत्रातील जीवन आहे, यापूर्वीही २ वर्षांपूर्वी ईडीने माझ्याकडे तपासणी केली होती, तेव्हाही काही सापडलं नाही. ४ दिवसांपूर्वीच कागल तालुक्यातील भाजपचे नेते दिल्लीत चकरा मारुन माझ्याबद्दल तक्रारी करत होते. तसेच, माझ्यावर ईडीची कारवाई होणार असल्याचंही ते सांगत होते. अशाप्रकारे नाउमेद करण्याचं काम जे चाललंय, ते अतिशय गलिच्छ राजकारण असल्याचं ते म्हणाले.