कोल्हापूर : यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये महिलाआरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. यानिमित्ताने राज्यातील १८ वर्षांवरील युवती, गरोदर महिला, मातांची तपासणी करण्यात येणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अशी संकल्पना घेवून विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.या सर्व युवती, गरोदर महिला आणि मातांची आरोग्य तपासणी करून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २६ सप्टेंबरपासून ही शिबिरे आणि कार्यक्रम सुरू होतील. रोज सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान ही शिबिरे होतील. २६ आक्टोंबरपर्यंत ही मोहिम राबवण्यात येणार आहे.हे केले जाणार
- प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची तपासणी होईल. वैद्यकीय अधिकारी स्वत तपासणी करतील. आजारी महिलांना उपचार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भित करण्यात येईल.
- उपकेंद्र किंवा आरोग्य वर्धिनी केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करावयाची असून यासाठी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी शिबीरे घेण्यात येणार आहेत.
- ग्रामीण रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोग तज्ज्ञांनी तपासणी करावयाची असून या कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक तज्ज्ञांची शिबिरे घेण्यात येणार आहेत.
- भरारी पथकाच्या माध्यमातून १८ वर्षांवरील युवती व महिलांची आरोग्य तपासणी केली जाईल.
- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकानेही शाळांमध्ये आरोग्य तपासणी करावयाची आहे.
- या दरम्यान नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
- सोनोग्राफी शिबिरे आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांबाबतही या दरम्यान माहिती देण्यात येणार आहे.