डंपरची अॅपेरिक्षाला धडक, बालक ठार, पाच गंभीर, अब्दुललाट-लाटेवारी रोडवर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 20:21 IST2017-12-03T20:20:56+5:302017-12-03T20:21:18+5:30
कोल्हापूर : अब्दुललाट-लाटेवाडी रस्त्यावर भरधाव डंपरने समोरासमोर अॅपेरिक्षाला धडक दिल्याने दोन वर्षाचे बालक जागीच ठार झाले.

डंपरची अॅपेरिक्षाला धडक, बालक ठार, पाच गंभीर, अब्दुललाट-लाटेवारी रोडवर अपघात
कोल्हापूर : अब्दुललाट-लाटेवाडी रस्त्यावर भरधाव डंपरने समोरासमोर अॅपेरिक्षाला धडक दिल्याने दोन वर्षाचे बालक जागीच ठार झाले. तर पाचजण गंभीर जखमी झाले. हरिस फिरोज मुल्ला (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे बालकाचे नाव आहे. तर जखमीमध्ये हसन नबी हारुगिरे (वय ५५), राबिया हसन हारुगिरे (५०) उमर फारुख हसन हारुगिरे ( २५), विजेफा हसन हारुगिरे (२६ सर्व रा. अब्दुललाट, ता. हातकणंगले), आसफा फिरोज मुल्ला (२८ रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. त्यांचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.
अधिक माहिती अशी, रिक्षा व्यवसायिक हसन हारुगिरे हे कुटुंबीयांसह सदलगे (ता. हातकणंगले) येथील नातेवाईकांच्या घरी दोन दिवस मुक्कामाचे नियोजन करुन आपल्या रिक्षातून रविवारी दूपारी निघाले होते. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर अब्दुललाट-लाटेवाडी रस्त्यावर समोरुन आलेल्या खडीच्या भरधाव डंपरने रिक्षाला धडक दिली. त्यामध्ये रिक्षातील सहाजण गंभीर जखमी झाले. हरिसचे डोके रिक्षाच्या लोखंडी पट्टीवर आदळल्याने डोक्याला गंभीर दूखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिक लोकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना तत्काळ शासकीय रुग्णवाहीकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. जखमी पोहोचण्यापूर्वी अपघाताची वर्दी रुग्णालय प्रशासनास दिली होती. त्यामुळे डॉक्टरांसह परिचारीका सज्ज होत्या. जखमी दाखल होताच त्यांचेवर तत्काळ उपचार करण्यात आले. अपघाताची वृत्त समजताच लक्षतीर्थ वसाहत, अब्दूललाट व इचलकरंजी येथील नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली.