Datta Jayanti 2025: ‘श्री गुरुदेव दत्त’ नामाने दुमदुमली नृसिंहवाडी, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:28 IST2025-12-04T14:28:07+5:302025-12-04T14:28:52+5:30
Nrusinhawadi Datta Jayanti 2025 Celebration: सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मकाळ होणार

Datta Jayanti 2025: ‘श्री गुरुदेव दत्त’ नामाने दुमदुमली नृसिंहवाडी, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
दुर्वा दळवी
कोल्हापूर: आज, गुरुवारी सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा होत आहे. कोल्हापुरातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी श्री दत्त संप्रदायाची राजधानी म्हणून ओळखली जाते. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा दुग्धशर्करा योग साधत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मध्यरात्रीपासूनच शिरोळ-कुरुंदवाड मार्गावरून हजारो भाविक ‘श्री गुरुदेव दत्त’ नामाचा जप करत नृसिंहवाडीत पायी चालत दाखल झाले. पहाटेपासून मंदिर परिसर दत्तमय नामाने दुमदुमून गेला आहे.
दत्तजयंती निमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी नृसिंहवाडीत येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनाने नियोजन केले आहे. मंदिर परिसर, कृष्णा-पंचगंगा संगम घाट आणि गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंदिरात गेल्या आठवड्याभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त पहाटे काकड आरती, षोडशोपचार पूजा,पंचामृत अभिषेक, महापूजा यांसारखे धार्मिक विधी संपन्न झाले असून दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा व महाप्रसाद, दुपारी तीन वाजता ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसूक्तांचे पठण होईल.
दुपारी चारनंतर नारायणस्वामी महाराजांच्या मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात आणण्यात येईल. सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मकाळ होणार आहे. त्यानंतर पारंपरिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा वाटण्यात येणार आहे. नऊनंतर धूप, दीप आरती व पालखी सोहळा झाल्यानंतर रात्री शेजारती होणार आहे. श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर विनोद पुजारी यांच्या घरी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
दत्त जयंतीनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी एकेरी वाहतूक ठेवून बंदोबस्त तैनात केला आहे. दत्त जयंती निमित्त नृसिंहवाडी नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेल्याचे पहायला मिळत आहे.