सौरऊर्जेचा शेतीला हातभार, शेतकऱ्यांचे जागरण थांबणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'या' गावात पंपांना दिवसा वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:57 IST2024-12-23T12:56:33+5:302024-12-23T12:57:04+5:30

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा

Due to solar power project, agricultural pumps in Kini, Vathar, Ghunki villages of Kolhapur district will get electricity during the day | सौरऊर्जेचा शेतीला हातभार, शेतकऱ्यांचे जागरण थांबणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'या' गावात पंपांना दिवसा वीज

सौरऊर्जेचा शेतीला हातभार, शेतकऱ्यांचे जागरण थांबणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'या' गावात पंपांना दिवसा वीज

संतोष भोसले

किणी : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून उभारलेला किणी (ता. हातकणंगले) येथील दोन मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे महावितरणकडून किणी, घुणकी, वाठार गावच्या जवळपास १२१६ शेती पंपांना आठ तास दिवसा वीजपुरवठा होणार आहे. यामुळे पिकांना रात्रपाळीला पाणी पाजण्याचा त्रास बंद होणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी गायरानातील जागा सौर प्रकल्पासाठी देऊन दिवसा वीजपुरवठ्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

महावितरणनकडून शेती पंपांना भारनियमन लागू असल्याने दिवसा व रात्री दोन टप्प्यांत वेळापत्रकानुसार विद्युतपुरवठा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची उन्हाळ्यात पुरती दैना होते. अनेक वर्षांपासून दिवसा शेती पंपांना वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासन व महावितरण कंपनीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. 

या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेतून विद्युत निर्मिती प्रकल्प उभारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या ठिकाणाची या प्रकल्पासाठी जमीन घेतली असेल, त्या गावातील शेती पंपांना दिवसा विद्युतपुरवठा करण्याचे धोरण आहे. त्यानुसार महावितरणकडून किणी, घुणकी, वाठारमधील विहीर, बोअरवेल, वारणा नदीवरील खासगी व सहकारी पाणी पुरवठ्याच्या जवळपास १२१६ शेती पंपांना सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच असा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस जीव मुठीत धरून पिकांना पाणी देण्याच्या त्रासातून सुटका होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. 

किणी येथील हत्ती माळ येथे दहा एकर क्षेत्रात प्रकल्प उभारण्यात आला असून, साडेचार हजार सौर पॅनल बसवले आहेत. यातून दोन मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या विजेतून वाठार उपकेंद्राद्वारे शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

तीन गावांना लाभ

सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने वाठर उपकेंद्रतील तीन गावातील भारनियमन बंद होऊन शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती वडगावचे उपकार्यकारी अभियंता अभिजित महामुनी यांनी दिली.

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. याचा आदर्श घेऊन अन्य ग्रामपंचायतींनी सौर प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, - विक्रांत पाटील (किणीकर) अध्यक्ष जिल्हा इरिगेशन फेडरेशन

Web Title: Due to solar power project, agricultural pumps in Kini, Vathar, Ghunki villages of Kolhapur district will get electricity during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.