दूधगंगा, वारणेतून विसर्ग वाढला, पंचगंगेचे पाणी फक्त दीड फुटांने कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 17:49 IST2021-07-29T17:47:12+5:302021-07-29T17:49:39+5:30
Kolhapur Flood : पावसाचा जोर ओसरला असलातरी अधून मधून येणाऱ्या जोरदार सरीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढच होत चालली आहे.सर्वच धरणातून कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे नद्या अजूनही इशारा पातळीवरुनच वाहत असल्याने महापुर ओसरण्यास वेळ लागत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीवर २४ तासात अवघ्या दीड फुटाची घट झाली आहे. वारणा, दूधगंगा, चिकोत्रा धरणातून गुरुवारी विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दूधगंगा, वारणेतून विसर्ग वाढला, पंचगंगेचे पाणी फक्त दीड फुटांने कमी
कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरला असलातरी अधून मधून येणाऱ्या जोरदार सरीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढच होत चालली आहे.सर्वच धरणातून कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे नद्या अजूनही इशारा पातळीवरुनच वाहत असल्याने महापुर ओसरण्यास वेळ लागत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीवर २४ तासात अवघ्या दीड फुटाची घट झाली आहे. वारणा, दूधगंगा, चिकोत्रा धरणातून गुरुवारी विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वारणा धरण ९१ टक्के भरल्याने ७ हजार ९८० वर असलेला विसर्ग १४ हजार ९८० क्यूसेक्सने वाढवण्यात आला आहे. दूधगंगा धरणाचा साठाही ८४ टक्केवर गेल्याने तेथून ३६०० क्यूसेक्स विसर्ग वाढवण्यात आला आहे. चिकोत्रा धरणही ९४ टक्के भरल्याने ५६० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग गुरुवारी संध्याकाळी सुरु करण्यात आला.
धरणातून वाढवलेल्या विसर्गाने वारणा व दूधगंगा, वेदगंगेत जास्तीचे पाणी येऊन महापूर ओसरण्यास वेळ लागत आहे. राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून विद्यूत विमोचकातून विसर्ग कायम आहे. शंभर टक्के भरलेल्या कडवी धरणातून विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पाण्याला उतार कमी झाला असून अजूनही पाणीपातळी ३९ फूट या इशारा पातळीच्याही वर आहे.
आठवडाभर पावसाचा लहरीपणा
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. अधून मधून एखाद दुसरी सर येत होती, त्यात फारसा जोर नव्हता. पुणे वेध शाळेने आज शुक्रवारी आणि उद्या शनिवारी रेड अलर्ट जारी केला असलातरी बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा झारखंड, राजस्थानकडे सरकल्याने दक्षिण भारतात मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही. ६ व ७ ऑगस्टला पाऊस परतेल, पुन्हा आठवडाभर ओढ घेईल असा सुधारीत अंदाज आहे.
नदीकाठाला दुर्गंधी
पावसाची उघडझाप सुरु असल्याने महापूर ओसरण्यास वेळ लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या अजूनही इशारा पातळीच्यावरच वाहत आहेत. दिवसाला एक फुटभरच पाणी कमी होत आहे. त्यात धरणातील विसर्गामुळे बऱ्यापैकी पाणी स्थिर राहिल्याचे दिसत आहे.पिके कुजत असल्याने नदीकाठाला आता दुर्गंधी सुटली आहे.
कोल्हापूर ते रत्नागिरी मार्ग बंदच
गुरुवारी संध्याकाळपर्यंत अजूनही ३७ बंधारे पाण्याखाली असून यावरुन होणारी वाहतूक अन्य मार्गे सुरु आहे. कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग अजूनही बंदच आहे.
धरणातील पाणीसाठा (टक्केवारीमध्ये)
राधानगरी ९९, तुळशी ९२, वारणा ९३ , दूधगंगा ८४, कासारी ८१, आंबेओहोळ ८८ , कुंभी ८४, पाटगाव ९१, चिकोत्रा ९४, जंगमहट्टी ९८, कडवी, चित्री, घटप्रभा, जांबरे, कोदे १०० टक्के
पाण्याखालील बंधारे
- पंचगंगा: शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
- भोगावती: हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे,
- तुळशी: बीड, आरे, बाचणी
- वारणा: चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगाव, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, चावरे, खोची, दानोळी
- कुंभी: कळे, वेतवडे
- कासारी: यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे आळवे
- कडवी: सरुड पाटणे
- वेदगंगा: कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली
- दूधगंगा: दत्तवाड, बाचणी, सुळकूड, सिध्दनेर्ली