कोल्हापूर येथील भीषण अपघातात सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टचा चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:33 IST2021-12-24T17:22:55+5:302021-12-24T17:33:39+5:30
सिंधुदुर्ग : बोलेरो पिकअप आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री सुमारे ...

कोल्हापूर येथील भीषण अपघातात सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टचा चालक ठार
सिंधुदुर्ग : बोलेरो पिकअप आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री सुमारे साडे दहाच्या सुमारास घडली. मृतात टेम्पो चालक सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथील चंद्रकांत ऊर्फ बाबल कृष्णा गावकर (५६) यांचा समावेश आहे. हा अपघात कागल कापशी रोड येथील शेंडूर तिठा बामणी गावानजीक घडला.
चंद्रकांत गावकर हे सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टचा माल घेऊन सावंतवाडीत येत असताना हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की या दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. त्यात हे दोन्ही चालक अडकून राहिले होते. बोलेरो पिकअप चालक संतोष पवार (शनिवार पेठ कोल्हापूर) याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. यात त्यांचाही मृत्यू झाला. बोलेरो पिकअप चालकाचा सहकारी वैभव राऊत याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शाहूपुरीत सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती गुरुवारी रात्री उशिरा ओटवणे गावात पोहोचताच ओटवणे गावठाणवाडी मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर यांच्यासह ग्रामस्थ तत्काळ कोल्हापूर येथे रवाना झाले. चंद्रकांत गावकर यांच्या निधनाचे वृत्त शुक्रवारी सकाळीच समजताच ओटवणे गावावर शोककळा पसरली. सर्वांनाच त्यांच्या अपघाती मृत्यूचा धक्काच बसला. गेली अनेक वर्षे चंद्रकांत गावकर हे विना अपघात चालक म्हणून सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टवर कार्यरत होते.
आज, शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव घेऊन गावी आणण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे. येथील चेतन आणि चंदन गावकर यांचे ते वडील होत.