चालत्या एसी आराम बसमध्ये ड्रायव्हर अन् प्रवाशी महिलेचा दम मारो दम कोल्हापूर–गोवा मार्गावरील खासगी ट्रॅव्हल्समध्ये चालत्या बसमध्येच धुम्रपान; प्रवाशांच्या जीवाशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:18 IST2025-12-25T13:16:28+5:302025-12-25T13:18:10+5:30
या आराम बसचा चालक आणि समोरच्या सीटवर बसलेली एक महिला प्रवासी चालत्या बसमध्येच सिगारेट ओढत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

चालत्या एसी आराम बसमध्ये ड्रायव्हर अन् प्रवाशी महिलेचा दम मारो दम कोल्हापूर–गोवा मार्गावरील खासगी ट्रॅव्हल्समध्ये चालत्या बसमध्येच धुम्रपान; प्रवाशांच्या जीवाशी खेळ
कोल्हापूर : कोल्हापूरहून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी बसमध्ये बुधवारी प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करणारा प्रकार समोर आला. या आराम बसचा चालक आणि समोरच्या सीटवर बसलेली एक महिला प्रवासी चालत्या बसमध्येच सिगारेट ओढत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. एकीकडे स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात सिगारेट घेत चालक झुरक्यावर झुरके मारत असल्याचा प्रकार सुरू असल्याने बसमधील प्रवासी भयभीत झाले होते.
कोल्हापुरातून सकाळी ८.१५ वाजता गोव्याकडे निघणारी ही एसी आराम बस (एआर ११ बी ४५४५) कोल्हापुरातच उशिरा दाखल झाली. सुमारे १०.१५ च्या सुमारास बस कोल्हापुरातून पुढे रवाना झाल्यानंतर चालक आणि त्याच्या बाजूला बसलेली महिला प्रवासी धुम्रपान करत असल्याचे स्पष्ट दिसून आले. हा प्रकार कोल्हापूर ते गोवा प्रवासादरम्यान सुरूच राहिला.
बसमधील अनेक प्रवाशांना सिगारेटच्या धुरामुळे त्रास होऊ लागल्याने त्यांनी चालकाला आणि संबंधित प्रवाशाला याबाबत तक्रार केली. मात्र, वारंवार सांगूनही दोघांनीही कोणाचेच ऐकले नाही. प्रवाशांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत धुम्रपान सुरूच ठेवल्याने बसमधील वातावरण अस्वस्थ झाले होते.
विशेष म्हणजे ही एसी आराम बस असल्याने धुम्रपानामुळे आग लागण्याचा धोका अधिक असतो. खासगी बसला आग लागून अपघात घडल्याच्या घटना नुकत्याच ताज्या असताना, अशा परिस्थितीत चालत्या एसी बसमध्ये सिगारेट ओढणे म्हणजे प्रवाशांच्या जीवावर थेट खेळण्यासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत खासगी स्लीपर व एसी बसला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तपासात अनेक ठिकाणी सिगारेट, बीडी किंवा जळती राख सीटवर, पडद्यावर किंवा गादीवर पडल्याने आग भडकल्याचे निष्पन्न झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षितता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित ट्रॅव्हल्सवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीत प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे होणारे दुर्लक्ष किती धोकादायक ठरू शकते, याचेच हे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
एसी बस सिगरेटमुळे उडू शकतो भडका
एसी बसमध्ये वापरले जाणारे सीट कव्हर, पडदे, छतावरील फोम, इन्सुलेशन मटेरियल आणि प्लास्टिकचे भाग हे ज्वलनशील असतात. सिगारेटचा पेटलेला टोक किंवा जळती राख सीटवर, पडद्यावर किंवा जमिनीवर पडली, तर काही सेकंदांतच धूर निघून आग भडकू शकते. अनेकदा ही आग सुरुवातीला लक्षातही येत नाही आणि क्षणार्धात मोठ्या आगीचे रूप घेते. तसेच एसी बसमध्ये बंद वातावरण असते. खिडक्या बंद, दरवाजे कमी वेळा उघडले जात असल्याने धूर आणि उष्णता आतच साचते. त्यामुळे लहान ठिणगीसुद्धा लवकर पेट घेते आणि आग वेगाने पसरते. शिवाय एसीमुळे हवा फिरत असल्याने जळती ठिणगी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकते.