Kolhapur: पारगावचे डॉ. विजय पाटील 'ऊस भूषण' पुरस्काराने सन्मानित; कष्टाचे चीज झाले, पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:23 IST2025-01-23T18:22:48+5:302025-01-23T18:23:13+5:30
गतवर्षीच्या हंगामात उसाचे विक्रमी उत्पादन काढले

Kolhapur: पारगावचे डॉ. विजय पाटील 'ऊस भूषण' पुरस्काराने सन्मानित; कष्टाचे चीज झाले, पण..
दिलीप चरणे
नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील कै. डॉ. विजय शंकरराव पाटील यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने ' ऊस भूषण ' पुरस्काराने सन्मानित केले. पाटील यांनी दक्षिण विभागात तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात को ८६०३२ वाणाचे एकरी १२४ (हेक्टरी ३१०.७३) टन एवढे विक्रमी उत्पन्न काढले आहे.
राज्यस्तरावरील ऊस स्पर्धेत पूर्ण तयारीने उतरून जोमदार उसाचे पीक आणले तथापि दुर्दैवाने डॉ. विजय पाटील यांचे चार महिन्यापूर्वी निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती शोभा, मुले डॉ. पृथ्वीराज व अभिजीत, भाऊ संजय, बाळासाहेब व राजू पाटील आदींनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'ऊस भूषण' पुरस्काराचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वीकारले.
तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे अध्यक्ष विनय कोरे, कार्यकारी संचालक भगत, मुख्य शेतीअधिकारी प्रमोद पाटील , ऊस विकास अधिकारी सुभाष करडे, मंडल अधिकारी विरेंद्र पाटील, अनिकेत केकरे, धनाजी पाटील, शरद पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
कुटुंबियांचे डोळे पाणावले
डॉ. विजय पाटील हे व्यवसायाने डॉक्टर होते. तरी त्यांना शेतीची मोठी आवड होती. रुग्णसेवा करीत असताना ते शेतात राबत असत. गतवर्षीच्या हंगामात त्यांनी खूप मेहनत घेऊन विक्रमी उत्पादन काढले. पुरस्कार जाहीर झाला पण आज ऊस भूषण पुरस्कारासाठी ते हयात नसल्याची खंत त्यांच्या कुटुंबियांना प्रकर्षाने जाणवली. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या कुटुंबियांचे डोळे पाणावले होते.