डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दुर्मीळ लघुपट चित्रपट संग्रहालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:22 AM2021-04-14T04:22:18+5:302021-04-14T13:14:25+5:30

Cinema Kolhapur : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जुलै १९६८ मध्ये तयार झालेल्या ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ हा दुर्मीळ लघुपट पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दाखल झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली.

Rare short film on Babasaheb Ambedkar in the film museum | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दुर्मीळ लघुपट चित्रपट संग्रहालयात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दुर्मीळ लघुपट चित्रपट संग्रहालयात

Next
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दुर्मीळ लघुपट चित्रपट संग्रहालयातलघुपटाचे लवकरच डिजिटायझेशन

संदीप आडनाईक

कोल्हापूर : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जुलै १९६८ मध्ये तयार झालेल्या ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ हा दुर्मीळ लघुपट पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दाखल झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली.

‘व्हटकर प्रॉडक्शन्स’ बॅनरची निर्मिती असलेल्या १८ मिनिटांच्या या लघुपटाचे दिग्दर्शन कोल्हापूरचे दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी केले होते. लघुपटाला सुप्रसिद्ध संगीतकार दत्ता डावजेकर यांचे संगीत होते, तर सुप्रसिद्ध हिंदी अभिनेते डेव्हिड अब्राहम यांनी या लघुपटाचे निवेदन केले होते. या लघुपटाची निर्मिती महाराष्ट्र सरकारच्या प्रसिद्धी संचालनालयातर्फे केली होती. हा लघुपट मुळात ३५ एमएमच्या स्वरूपात असून, त्याची १६ एमएम स्वरूपातील प्रिंट संग्रहालयाला मिळाली आहे.

या दुर्मीळ लघुपटात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख घटनांवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यांच्या अखेरच्या काळातील काही घटनांचे ‘फुटेज’ यामध्ये पाहायला मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे स्वीकारललेला बुद्ध धर्म, तसेच त्यांनी केलेला नेपाळ दौरा, याशिवाय मुंबई येथील दादर चौपाटी येथे आंबडेकर यांच्या निघालेल्या अंत्ययात्रेचे ठळक चित्रीकरण या लघुपटात पाहायला मिळते. या लघुपटाचे छायाचित्रण मधुकर खामकर यांनी केले असून, जी.जी. पाटील यांनी संकलन केले आहे.

लघुपटाचे लवकरच डिजिटायझेशन

ग्रामीण भागात वितरण करण्याच्या हेतूने या लघुपटाच्या १६ एमएमच्या प्रिंटस्‌ काढल्या असाव्यात. या प्रिंटची सध्याची अवस्था ही मध्यम स्वरूपातील असून, त्याचे लवकरच डिजिटायझेशन करण्यात येईल जेणेकरून ती अधिकाधिक प्रेक्षकांना पाहता येऊ शकेल, अशी माहिती चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उद्या १४ एप्रिल रोजी देशात सर्वत्र उत्साहाने साजरी केली जात असतानाच डॉ. आंबेडकर यांच्यावरील हा दुर्मीळ लघुपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे प्राप्त होणे हा एक अपूर्व योगायोग आहे.
-प्रकाश मगदूम,

संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे

 

Web Title: Rare short film on Babasaheb Ambedkar in the film museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.