कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी पहिल्यांदाच महिलेला संधी, डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:15 IST2025-10-31T12:14:54+5:302025-10-31T12:15:13+5:30
कंत्राटी प्राध्यापक ते प्र-कुलगुरू असा प्रवास

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी पहिल्यांदाच महिलेला संधी, डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी विद्यापीठातीलच जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती जाधव यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी कुलगुरू पदाच्या विशेष अधिकारांतर्गत प्र-कुलगुरूसाठी जाधव यांची नियुक्ती केली.
विद्यापीठाच्या ६३ वर्षाच्या इतिहासात प्र-कुलगुरूपदी पहिल्यांदाच महिलेस संधी मिळाली आहे. विद्यापीठात नियमित कुलगुरू नियुक्त होईपर्यंत त्यांचा प्रभारी प्र-कुलगुरू पदाचा कार्यकाळ असणार आहे. जागतिक स्तरावर आघाडीच्या दोन टक्के संशोधकांमध्ये त्यांचा समावेश आहे.
माजी कुलगुरू डी. टी. शिर्के यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ ६ ऑक्टोबरला संपला. त्यांच्याबरोबर प्र-कुलगुरू व चार अधिष्ठाता यांचा कार्यभार संपला होता. त्यामुळे प्र-कुलगुरू कोण होणार याबाबतची उत्सुकता होती. प्र-कुलगुरू पदासाठी त्यांच्या नावाच्या शिफारशीस व्यवस्थापन परिषदेने संमती दिली.
कुलगुरू डॉ. गोसावी यांनी गुरुवारी सायंकाळी डॉ. जाधव यांना प्र-कुलगुरूपदी नियुक्त केल्याचे पत्र दिले. विद्यापीठ प्रशासनाकडून कुलपती कार्यालयाला कळविले आहे. डॉ. जाधव यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. संशोधक, कंत्राटी प्राध्यापक, वरिष्ठ प्रोफेसर, अधिष्ठाता ते प्र-कुलगुरू असा चढता आलेख राहिला आहे.
चौघांचे होते प्रस्ताव
या पदासाठी डॉ. आर. व्ही. गुरव, डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. बी. जी. कणसे व डॉ. ज्योती जाधव यांच्या नावाचे प्रस्ताव अधिकार मंडळासमोर आले होते. यात डॉ. जाधव यांच्या नावाच्या शिफारशीस व्यवस्थापन परिषदेने एकमतानी संमती दिली.