डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
By समीर देशपांडे | Updated: December 6, 2025 10:29 IST2025-12-06T10:27:04+5:302025-12-06T10:29:09+5:30
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी व सामाजिक न्यायासाठी जे काम केले तेच काम डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर करत होते.

डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
समीर देशपांडे, कोल्हापूर
‘संविधान’कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतच त्यांचा पुतळा कोल्हापूर शहरातील बिंदू चौकामध्ये उभारण्यात आला. पुरोगामी चळवळीतील तत्कालीन अग्रणी भाई माधवराव बागल यांच्या पुढाकारातून जनतेच्या सहभागातून हा पुतळा उभारण्यात आला असून ९ डिसेंबर २०२५ रोजी या पुतळ्याच्या उद्घाटनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. येथील प्रसिद्ध शिल्पकार स्वर्गीय बाळ ऊर्फ शंकर चव्हाण यांनी हा पुतळा तयार केला होता. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले. परंतु त्याआधीच सहा वर्षांपूर्वी त्यांचा पुतळा उभारून करवीरकरांनी त्यांना एक अनोखी मानवंदना दिली होती.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी व सामाजिक न्यायासाठी जे काम केले तेच काम डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर करत होते. त्यामुळे आंबेडकर यांच्या हयातीतच त्यांचा पुतळा उभारून सन्मान करण्याची माधवराव बागल यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी पुतळा समिती स्थापन केली. बागल हेच या समितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांच्या विचारांचे जनतेला स्मरण व्हावे, यासाठी पुतळा बिंदू चौकात उभारण्याचे ठरले.
७५ वर्षांपूर्वी उद्घाटन
ब्रांझमधील हा अर्धपुतळा चबुतऱ्यावर बसविण्यात आला असून ९ डिसेंबर १९५० रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हा द. मा. साळोखे हे कोल्हापूरचे नगराध्यक्ष होते तर व्ही. जी. चव्हाण हे सहायक होते.
गेल्या ७५ वर्षांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती, पुण्यतिथीपासून ते सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमावेळी या पुतळ्याला अभिवादन करूनच कार्यक्रम सुरू करण्यात येतो. बिंदू चौकातील हा डॉ. आंबेडकर यांचा पुतळा त्यांच्या हयातीमधील जगातील पहिला पुतळा मानला जातो.