Mahaparinirvan Din 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पन्हाळगडावर सव्वा एकर जमीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:42 IST2025-12-06T13:41:18+5:302025-12-06T13:42:22+5:30
राजर्षी शाहू महाराजांच्या पश्चात राजाराम महाराज यांच्याकडून बक्षीसपत्र : आंबेडकर यांच्यासारखे विद्वान करवीर भूमीत राहावेत ही भावना

Mahaparinirvan Din 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पन्हाळगडावर सव्वा एकर जमीन
संदीप आडनाईक
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पन्हाळगडाशी जवळचे नातेसंबंध आहे. कामानिमित्त देशभरात अनेक त्यांनी मुक्काम केला, परंतु, राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्यांना ऐतिहासिक पन्हाळगडावर सव्वा एकर जागा मिळाली. पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेने डॉ. आंबेडकर स्मृतिउद्यान या नावाने ही जागा सध्याच्या विकास आराखड्यात आरक्षित केली आहे. या जागेसंदर्भातील प्रस्ताव सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ. आंबेडकर यांना ‘लोकमान्य’ पदवी, हयातीतच पुतळा उभारणी, करवीर इलाख्यात वकिलीची सनद आणि पन्हाळगडावर सव्वा एकर मोफत जागेचा वायदा केला होता. राजाराम महाराजांनी ८ मे १९२९ रोजी करवीर इलाख्यात त्यांच्या वकिलीच्या सनदीचे नूतनीकरण केले. शिवाय पन्हाळा येथील रिसनं ६५२/८ ब ही १ एकर ९ गुंठे जागा (४९५७.२ चौरस मीटर.) २६ जानेवारी १९३५ रोजीच्या मंजुरीने बक्षीसपत्राने दिली होती. वनखात्याकडून ही जागा डॉ. आंबेडकर या नावे वर्ग केली गेली आहे. आता या जागेवर सरकारी अशी नोंद आहे.
वाचा : माणगाव परिषदेचा डंका जगभर, हॉलीग्राफ शो मात्र बंद स्थितीत
स्मारकासाठी लढाई
दलितमित्र बापूसाहेब पाटील यांना या जागेसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यावर स्मारकाचे आरक्षण होते. परंतु १९८२ च्या विकास आराखड्यात त्यावर चक्क एका हॉटेलचे आरक्षण पडले. तत्कालीन समाज कल्याणमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या प्रयत्नातून माजी नगरसेवक चंद्रकांत गवंडी यांनी २००३ नंतर ते उठवले. आता नव्या आराखड्यात त्यांच्या नावे स्मृतिउद्यान आरक्षित करून ही जागा नगरपालिकेने जपली आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जागेची मागणी
सध्या या जागेवर महसूलची नोंद आहे. ती जागा डॉ. आंबेडकर यांना बक्षीसपत्राद्वारे मिळाल्याने ती वारसा हक्काने मिळावी अशी भूमिका डॉ. आंबेडकर यांचे नातू भीमराव आणि प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.