कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दान पेट्यांची मोजदाद पुर्ण, किती कोटींची जमा झाली देणगी... जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:34 IST2025-10-18T15:32:54+5:302025-10-18T15:34:12+5:30
यंदा नवरात्रौत्सव काळात १७ ते १८ लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दान पेट्यांची मोजदाद पुर्ण, किती कोटींची जमा झाली देणगी... जाणून घ्या
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात १ काेटी २१ लाख ३२ हजार ०३५ रुपये इतक्या रकमेची देणगी जमा झाली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दान पेट्यांची मोजदाद शुक्रवारी पूर्ण झाली. आता दिवाळीच्या सुट्टीतदेखील मोठ्या प्रमाणात परस्थ भाविक व पर्यटक अंबाबाई मंदिराला भेट देतात.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील देवता असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात देशभरातील भाविक येतात. यंदा नवरात्रौत्सव काळात १७ ते १८ लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. नवरात्रौत्सवापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दान पेट्या मोकळ्या केल्या होत्या त्यानंतर आता २० दिवसांनी या पेट्या उघडण्यात आल्या.
बुधवारपासून या दानपेट्यातील रकमेची मोजदाद सुरू होती. शुक्रवारी ती पूर्ण झाली. मंदिर आवारात एकूण १२ दान पेट्या असून त्यामधून १ कोटी २१ लाख ३२ हजार रुपयांची देणगी जमा झाली.
आता दिवाळी सुरू झाली अशून या सुट्ट्यांमध्येदेखील मोठ्या संख्येने पर्यटक अंबाबाई दर्शनासाठी येतात. याकाळातही मोठ्या प्रमाणात दानपेट्यांमध्ये रक्कम जमा होते.
- किती भाविकांनी घेतले दर्शन : १७ ते १८ लाख
- किती दिवसांनी उघडल्या पेटया : २०
- एकूण दानपेट्या : १२
- किती दान : १ कोटी २१ लाख ३२ हजार