Kolhapur: शासकीय योजनेतील मोफत शस्त्रक्रियेसाठी ८ हजाराची लाच घेणाऱ्या डॉक्टराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:19 IST2025-01-21T12:18:28+5:302025-01-21T12:19:18+5:30
गडहिंग्लज येथे लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई

Kolhapur: शासकीय योजनेतील मोफत शस्त्रक्रियेसाठी ८ हजाराची लाच घेणाऱ्या डॉक्टराला अटक
गडहिंग्लज : महात्मा जोतिराव जनआरोग्य योजनेतून मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी ८ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या डॉक्टरासह रूग्णालयाच्या प्रशासकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी डॉ. अजित वसंतराव पाटोळे (वय ४९, रा. साधना हायस्कूलजवळ, संभाजीनगर, गडहिंग्लज) व रूग्णालयाचे प्रशासक इंद्रजीत शिवाजीराव पाटोळे (वय ४८, रा. मिसाळ चाळ, आझाद रोड, गडहिंग्लज) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे गडहिंग्लजसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराचा मित्र १० जानेवारीला सायंकाळी चक्कर येवून पडला. त्याच्या डाव्या खुब्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी डॉ. पाटोळे यांच्या स्वराज्य मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉ. पाटोळे यांनी रूग्णाची तपासणी केल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. महात्मा फुले योजनेतून ही शस्त्रक्रिया होवू शकते. मात्र, त्यासाठी २० हजार रूपये भरावे लागतील असे त्यांनी सांगितले. तडजोडीअंती १८ हजार रूपये भरण्याचे ठरले. त्यानुसार १५ जानेवारीला १० हजार रूपये दिल्यानंतर गुरूवारी (१६) रूग्णावर त्यांनी शस्त्रक्रिया केली.
उर्वरित ८ हजार रूपये रूग्णालयाचे प्रशासक इंद्रजीत पाटोळे यांच्याकडे देण्यात सांगितले. दरम्यान, रूग्णाच्या मित्राने लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानुसार सापळा लावून ८ हजार रूपये स्विकारताना प्रशासक पाटोळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनिल मोरे, पोलिस हवालदार सुनिल घोसाळकर, संदीप काशीद, पोलिस नाईक सचिन पाटील, कॉन्स्टेबल संदीप पवार, सहायक फौजदार गजानन कुराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आधी संमती..नंतर तक्रार..!
स्वराज्य हॉस्पिटलमध्ये रूग्णाला दाखल केल्यानंतर त्याच्या डाव्या पायाच्या खुब्याला दुखापत झाली असून त्याची शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेतून मोफत होईल. परंतु, अन्य आजाराच्या औषधोपचाराचा खर्च द्यावा लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यास रूग्णाच्या बहिणीने लेखी संमती दिली. त्यानंतर लाचलुचपतकडे झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.अशाप्रकारची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे.