Kolhapur: 'अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करू नका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:54 IST2025-09-05T18:53:40+5:302025-09-05T18:54:08+5:30

शिक्षक संघटनेने दिली न्यायालयाच्या आदेशाची माहिती, स्वेच्छेने काम करण्याच्या भूमिकेचे कौतुक

Do not take action against teachers who boycott non academic activities | Kolhapur: 'अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करू नका'

Kolhapur: 'अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करू नका'

कोल्हापूर : अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नका, याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंच येथे दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी कामगिरीवर बहिष्कार टाकलेल्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करु नका, असा आदेश दिल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिका तसेच खासगी शाळा शिक्षक संघटना कृती समितीचे निमंत्रक भरत रसाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, ऐनवेळी महापालिकेकडे पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे दि. ६ सप्टेंबर रोजीच्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या वेळी स्वयंसेवक म्हणून स्वेच्छेने कामगिरी करण्याची शिक्षक संघटनेने घेतलेल्या भूमिकेचे न्यायालयाने कौतुक केल्याची माहितीही देण्यात आली.

शासनाने शिक्षक हक्क कायदा २००९ लागू केला आहे. यानुसार जनगणना, प्रत्यक्ष निवडणुका आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांव्यतिरिक्त शिक्षकांना अन्य अशैक्षणिक कामे देता येणार नाहीत, असे नमूद केले आहे. राज्य शासनानेही वेळोवेळी असे आदेश काढलेले आहेत. गतवर्षी आम्हाला फक्त शिकवू द्या, या मागणीसाठी शिक्षकांनी राज्यभर मोर्चे काढले. परिणामी २३ ऑगस्ट २०२४ रोजी शासनाने शैक्षणिक कामे आणि अशैक्षणिक कामांचे स्पष्टीकरण दिलेले आहेत. तरीही कारणे सांगून शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावली जातात. 

कोल्हापूर महानगरपालिकेने अनेक वेळा अशी कामे दिली आहेत. गतवर्षी आदेश असतानाही प्रशासनाने विनंती केल्यामुळे शिक्षकांनी गणेश विसर्जनादरम्यान सहकार्य केले. यावेळीही १५ दिवस आधीच प्रशासनाला विसर्जनादरम्यानचे अशैक्षणिक कामे लावू नका, असे लेखी निवेदन दिले होते. तरीही यावर्षी ५०० शिक्षकांना विसर्जनादरम्यानच्या कामगिरीचे आदेश काढले. न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे पत्र काढल्याने शिक्षकांत असंतोष पसरला आहे.

त्यामुळे शिक्षकांनी बहिष्कार टाकून ॲड. आदित्य रक्ताडे यांच्यामार्फत सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. यासंदर्भात महापालिकेला ॲफिडेव्हिएट सादर करण्यास मुदत दिली असून, २३ सप्टेंबरला अंतिम निर्णय देण्याबाबत संकेत दिल्याचे रसाळे यांनी सांगितले. यावेळी आयफेटोचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, विलास पिंगळे, दिलीप माने, जयश्री कांबळे, किरण पाडळकर, शिवाजीराव भोसले, संजय पाटील, दस्तगीर मुजावर, अमित जाधव, नामदेव वाघ उपस्थित हाेते.

Web Title: Do not take action against teachers who boycott non academic activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.