Kolhapur: तकलादू विकासकामे करू नका, अजित पवार यांनी बजावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:32 IST2025-03-28T12:31:16+5:302025-03-28T12:32:55+5:30
हद्दवाढीवर लवकरच सकारात्मक निर्णय

Kolhapur: तकलादू विकासकामे करू नका, अजित पवार यांनी बजावले
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जा व गुणवत्तेबाबत तडजोड, तकलादू कामे करू नका. अनुभवी कॉन्ट्रॅक्टर नेमा, पन्हाळ्याचे सुशोभीकरणात स्थानिकांना विश्वासात घ्या, भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून सोयीसुविधा द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातील पर्यटनवाढीच्या कामांसाठी शासनाकडून तत्काळ निधी दिला जाईल. गरजेच्या विकासकामांबाबत केंद्र सरकारशी चर्चा करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, बाबासाहेब आसुर्लेकर उपस्थित होते.
कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी मनपाच्या नवीन इमारतीसाठी शेंडा पार्क येथील दोन एकर जागा मिळावी, अशी मागणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता चांगला आहे. येथील १ हजार ९५८ शाळांचा 'समृद्ध शाळा' अभियानाच्या यशस्वितेसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
यावेळी अंबाबाई व जोतिबा मंदिर विकास आराखडा, क्रिकेट स्टेडियम, कोल्हापूर विमानतळ, पंचगंगा प्रदूषण, शाहू स्मारक भवन, शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम, आयटी हब, शेंडा पार्क येथील रुग्णालय, सारथी संस्था, पंचगंगा प्रदूषण नियंत्रण तसेच कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
७० कोटींचा निधी मिळावा : जिल्हाधिकारी येडगे
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांसाठी शासनाकडून ७० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी केली. शेंडा पार्कातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तीस विभागांना जागा दिली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय कन्व्हेंक्शन सेंटरचे भूमिपूजन केले जाईल असे सांगितले.
हद्दवाढीवर लवकरच सकारात्मक निर्णय
कोल्हापूरच्या हद्दवाढीसंदर्भात नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आहे. याबाबत लवकरच सकारात्मक मार्ग निघून निर्णय होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.